शहरात 28 कोटींची कामे

0

पुणे । महापालिकेच्या डिसेंबर महिन्यातील मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर प्रभागातील विविध कामांसंदर्भातील तब्बल शंभर वर्गीकरणाचे प्रस्ताव आले आहेत. त्यातून 28 कोटींची कामे शहराच्या विविध भागात होणार आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीतील कार्यपत्रिकेवरील वर्गीकरणांच्या प्रस्तावांचा हा उच्चांक असून मुख्य सभेत आयत्या वेळेसही आणखी किमान 80 ते 100 प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. एकाच महिन्याच्या कार्यपत्रिकेवर जवळपास 200 प्रस्ताव येण्याचा हा एकप्रकारे विक्रम असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. आर्थिक वर्ष संपायला चार महिने बाकी राहिल्यामुळे कामे करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

विविध विकासकामे करण्यासाठी नगरसेवकांची चढाओढ सुरू
महापालिकेच्या स्थायी समितीने तब्बल 5,912 कोटींचे अंदाजपत्रक मे महिन्यात सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये प्रभागामध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच अन्य नगरसेवकांनाही निधीची तरतूद करण्यात आली. या अंदाजपत्रकावर चर्चा करून जून महिन्याच्या शेवटी अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. आता अंदाजपत्रकाचा कालावधी संपण्यास अवघे चार महिने राहिले आहेत. अंदाजपत्रकातील हा निधी वापरला गेला नाही तर ही रक्कम अखर्चित राहणार आहे. त्यामुळे प्रभागात विविध विकासकामे करण्यासाठी नगरसेवकांची चढाओढ लागली आहे.

वर्गीकरणाचे 100 प्रस्ताव
पाच लाखांपासून तब्बल एक कोटीपर्यंतची विविध कामे करण्यासाठीचे नियोजन नगरसेवकांकडून करण्यात आले आहे. तसे वर्गीकरणाचे 100 प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर मंजुरीसाठी आले आहेत. प्रभागात विकासकामे करण्याबरोबरच अंदाजपत्रकात अन्य काही मोठ्या प्रकल्पांसाठी राखीव असलेली रक्कमही प्रभागातील कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचे या वर्गीकरणांच्या प्रस्तावावरून दिसून येत आहे.

वर्गीकरण म्हणजे काय?
महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये प्रभागामध्ये विविध कामे करण्यासाठी नगरसेवकांना निधी दिला जातो. त्या-त्या भागातील आवश्यकता किंवा स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे करण्यासाठीचे प्रस्ताव नगरसेवकांकडून स्थायी समितीला दिले जातात. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्य सभेची मंजुरी मिळाली की कामांना प्रारंभ होतो. 5 लाखांपासून किमान 1 कोटीपर्यंतची कामे अंदाजपत्रकातील निधीतून सुचविली जातात. मात्र काही नगरसेवकांकडून त्यांना मिळणार्‍या या आर्थिक तरतुदी व्यतिरिक्त अंदाजपत्रकातील पूर्ण होऊ न शकणार्‍या योजनांचा निधीही प्रभागातील कामांसाठी वापरण्यात येतो. त्यासाठी वर्गीकरणाचे प्रस्ताव देण्यात येतात.

100 प्रस्ताव आयत्यावेळी दाखल होणार!
सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आली. अंदाजपत्रकाची अंमलबजावणीस सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने हे प्रस्ताव एकाच महिन्याच्या कार्यपत्रिकेवर आले आहेत. स्थायी समितीच्या माध्यमातून हे प्रस्ताव मुख्य सभेला सादर झाले आहेत. दरम्यान, स्थायी समितीपुढे या प्रकारचे आणखी सुमारे 80 ते 100 प्रस्ताव मान्यतेसाठी आले असून हे सर्व प्रस्ताव मुख्य सभेत आयत्यावेळी दाखल होण्याची शक्यता नगरविकास विभागातील अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली.

नगरसेवकांनी सुचविली कामे
रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, विद्युत व्यवस्था, उद्यानांची उभारणी, प्रमुख रस्ते, चौक आणि परिसराचे सुशोभीकरण, मेघडंबरी करणे, मैलापाणी वाहिन्या टाकणे, जलवाहिन्या टाकण्यांची कामे करणे, भूमिगत वाहिन्यांचे जाळे उभारणे, सीमाभिंतीची उभारणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रांची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महापालिका शाळांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी, व्यायामशाळा, ज्युट बॅग पुरविणे, जेटींग मशीनद्वारे साफसफाई, प्रभाागातील प्रमुख रस्ते, उप तसेच जोड आणि अंतर्गत रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, युवक-युवतींसाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना अशी काही कामे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविली आहेत. ही सर्व कामे तब्बल 28 कोटींची असून असे शंभर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.