शहरात 3 नोव्हेंबरला दिवाळी आधीचे ‘बाँम्ब’

0

मावळ लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

निगडीत मुख्यमंत्री फडणवीस ,रहाटणीत शरद पवार यांच्या सभा, आरोपांच्या फैरी झडणार

पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण निर्मितीसाठी तिन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. शहरात शनिवारी (दि. 3) रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहेत. तर, कर्जत येथे उध्दव ठाकरे यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील.या सा-रामुळे मतदार संघातील सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आरोपांमध्ये कोणते नवे मुद्दे आणि कोणती नवी घोषणा होणार या बाबत उत्सुकता आहे. तिन्ही पक्षांनी एकमेकांना टक्कर देण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला आहे.

भाजप फोडणार नारळ

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मावळ लोकसभा मतदार संघातील निगडीत मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी (दि. 3) रोजी फोडण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मुख्यमंत्र्यांची ही सभा म्हणजे भाजपचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. अनधिकृत बांधकामे, रिंगरोड, पाणी टंचाई, नगरसेवकाकडून होत नसलेले प्रभावी काम, पक्षातील गटबाजी, मंत्रीपदावरून झालेली नाराजी, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने,महापालिका पदाधिकार्‍यांचे वर्तन, बंद पाइपलाइनचे अडकलेले घोंगडे, नेत्यामधील दुही असे अनेक विषय शहरात आहेत. यावर फडणवीस काही बोलतील का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादीची कामगार परिषद

भाजपच्या सभेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व मावळ लोकसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार संजोग वाघेरे यांनी कामगार परिषदेचे निमित्त साधून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा याच दिवशी ठेवली आहे. रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे ही सभा होणार असून शहराचे तत्कालीन कारभारी अजित पवार हे देखील कामगारांच्या प्रश्‍नांवरून सत्ताधारी भाजपचा खरपूस समाचार घेणार आहेत. महापालिकेत सत्ता असताना केलेले काम आणि सध्या भाजपचे काम याची तुलना, निवडणुकात कोणाला मिळेल उमेदवारी, राज्य शासनाचा कारभार, शहर भाजपात गेलेले लोक…या विषयी काका-पुतणे तोफ डागतील.

कर्जतमध्ये उद्या ठाकरे

या दोन्ही सभा फेल ठराव्यात, यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे रांनी कर्जतमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन दोन दिवस आधी म्हणजे गुरूवारी (दि. 1) रोजी केले आहे. बारणे यांना भाजपच्या उमेदवारापासून धोका असल्याने कोणत्याही परिस्थितीत मतदार संघात भाजपला फेव्हर असे वातावरण तयार होणार नाही, यासाठी त्यांनी प्रयत्न पनाला लावले आहेत. यासाठीच कर्जतमध्ये ठाकरे यांच्या करारी शब्दांत सत्ताधा ऱ्यावर हल्ला चढविला जाणार आहे. लोकसभेच्या अनुषंगाने मावळ मतदार संघात तीन दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.