शहरामध्ये वाहनांचे वाढते प्रदूषण धोकादायक

0

जळगाव । शहराच्या मुख्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम होत असल्याने रस्त्यांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. महार्गावर जाणारे अवजड वाहने देखील वर्दळीच्या ’नो पार्किग’ परिसरात असल्याने रस्ते अधिक जाम होत आहे. पाच मिनटांच्या अंतरावर जाण्यासाठी आर्धा तास लागत असून मोटारसायकल धारक देखील हैराण झाले आहेत. मोटार सायकल कंपन्यांनी विविध सुविधा उपलब्ध केल्याने मोठ्या प्रमाणात वाहनाची संख्या देखील शहरात वाढली असल्याने ते प्रमुख कारण रस्ते जाम होण्याचे आहे. यामुळे शहराचे प्रदुषण देखील आटोक्याच्या बाहेर जात असून रस्त्यांना आणि नागरिकांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. ठिकठिकाणी रस्ते जाम झाल्यास एक तास वाहतूक पोलिसांना रस्ता मोकळा करण्यास लागतो. अनेक ठिकाणी तर पोलीस नसल्यास नागरिकच वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न करतात मात्र यामुळे वाद सुद्धा निर्माण होत आहे. यामुळे शहराच्या वाहतुकीचे नियोजन प्रशासनाला करणे गरजेचे आहे. वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणार्‍यावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे.

अवजड वाहनावर व्हावी कारवाई
शहरात दिवसा नो पार्किग झोन अवजड वाहनांना आखून दिल्यावर देखील वाहने शहरात आणली जातात यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. नागरिकांना होत असलेल्या वाहतुकीच्या त्रासा मुळे अनेक वेळा तक्रारी करण्यात येतात. मात्र बर्‍याच वेळा याप्रकरणामध्ये दुर्लक्ष करण्यात येते. महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. पण त्याच अतिक्रमण विभागाच्या गाड्या रस्त्यात आडव्या लाऊन अतिक्रमण होते. नेहमी प्रमाणे नागरिकांनी विरोध केल्यास एकेरी भाषेत आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

रस्त्यात उभ्या करतात रिक्षा
वाहत्या रस्त्यात रिक्षाचालक प्रवाशाला बसविण्यासाठी वाहने थांबवितात. यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून शहरात सर्वार्धिक वाढलेल्या रिक्षामुळे प्रदूषण देखी वाढल आहे. यांची पीयूसी तपासणी करताना वाहतूक पोलीस मात्र कधीही दिसून येत नाही. कालबाह्य झालेल्या रिक्षा अद्याप सुद्धा रस्त्यावर चालताना दिसतात. मात्र पोलीसा कडून कागदेपत्रे विचारली जातात. पण कालबाह्य झाल्याची शहानिशा वाहतूक पोलीस करत नसल्याची परिस्थिती आहे. याप्रकरणी शहरात कार्यवाही सत्र राबविल्यास प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

अतिक्रमण कारवाई; परिस्थिती जैसे थे !
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. मात्र घाणेकर चौकातील फळे विक्रेत्यांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे, करून ठेवल्याने मुख्यमार्गात वाहतूक विस्कळीत होत आहे. अनेक वेळा कार्यवाही होऊन देखील विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहनाची धक्का-बुकी झाल्यास अनेकवेळा हाणामारीचे प्रकार समोर आले आहे.एकाच ठिकाणी काहीकाळ वाहने थांबल्यास वाहनाच्या धुराने संपूर्ण परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शहराचे रस्ते चांगल्या स्थितीत मध्ये असणे गरजेचे आहे. बर्‍याच वेळ सिग्नलवर वाहने थांबतात यावेळेत बंद करण्यात आले तर यामुळे प्रदूषण होण्यास बचाव होऊ शकतो. रस्त्याच्या कडेला झाडे लावले पाहिजे. यामुळे प्रदूषण कमी होते.
– डॉ ए. टी. इंगळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ