शहर अस्वच्छ करणार्‍यांना आधी नोटीस बजावा

0

पुणे । महापालिकेच्या घनकचरा आणि आरोग्य विभागाकडून शहरात अस्वच्छता तसेच सार्वजनिक आरोग्यास नुकसान पोहचविणार्‍या नागरिकांवर थेट खटले दाखल केले जात आहे. ही संख्या सर्वाधिक असल्याने त्याचा विधी विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. या विभागांनी थेट खटले दाखल न करता आधी नोटीस द्याव्यात, त्यानंतर कारवाई करावी आणि त्यानंतर गरज असेल, तरच खटले दाखल करावेत, अशा सूचना विधि विभागाने दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.शहरात अस्वच्छता पसरविणार्‍या तसेच प्लॅस्टिकचा वापर करणार्‍या नागरिकांवर वारंवार कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही नागरिकांकडून वारंवार असे प्रकार घडत असल्याने घनकचरा विभाग तसेच सार्वजनिक आरोग्यास बाधा निर्माण केली म्हणून आरोग्य विभागाकडून नागरिकांवर थेट खटले भरले जातात.

…तरच खटले दाखल करा
महापालिका न्यायालयात या खटल्यांची संख्या लक्षणीय असून ते प्रलंबित असल्याचे दिसते. या खटल्यांसाठी वकिलांची नियुक्ती, माहिती तयार करणे या कामांसाठी मोठा वेळ खर्ची पाडावा लागतो. त्यामुळे कामकाज कोलमडते. या सर्व विभागांनी आधी नोटीस द्यावी, त्यानंतर नियमानुसार, दंडात्मक कारवाई करावी, त्यानंतर आवश्यकता असेल तरच न्यायालयात खटले दाखल करावेत, अशा सूचना विधी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.