शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीचे वारे

0

पुणे। उत्सवांच्या धामधुमीच्या काळातच पुणे शहर काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची धांदल राहणार आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात दहीहंडी, गणेशोत्सव असे लोकप्रिय उत्सव आहेत. सर्वत्र त्यांची जोरदार तयारी चालू आहे. त्याचवेळी राजकीय पातळीवर काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होत आहेत. त्यातही अध्यक्ष निवडीची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये जास्त आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक संजय बालगुडे आणि पुणे महापालिकेतील पक्षाचे गट नेते अरविंद शिंदे या तिघांची नावे चर्चेत आहेत.

अध्यक्ष पदाची निवड तीन वर्षांसाठी असते. नवीन होणार्‍या अध्यक्षाच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने या निवडीत सर्वच वरीष्ठ नेत्यांचे लक्ष घातले आहे. तिघांनाही संघटनात्मक कामाचा अनुभव असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तिघांचाही संपर्क आहे.

अध्यक्षांपुढे आर्थिक आव्हान
सध्या पक्षाकडे सत्ता नसल्याने शहराध्यक्षपदाचे आव्हान कोण स्वीकारणार असे मत एका नेत्याने व्यक्त केले. अध्यक्षाला आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर उचलावा लागतो. काँग्रेस भवनाचे व्यवस्थापन पाहणे, कर्मचार्‍यांचे पगार करणे, वर्षभरातील नैमित्तिक कार्यक्रम करणे. या सगळ्याचा खर्चच काही लाखांमध्ये जातो. याखेरीज आंदोलने, शिबीरे, सभा, नेत्यांचे दौरे, प्रसिद्धी यंत्रणा यासाठीही अध्यक्षालाच निधी उभारावा लागतो. हाती सत्ता नसताना हे आर्थिक आव्हान कोण पेलणार? असाही सवाल या नेत्याने केला.

इच्छुकांनी मोर्चेबांधणी
अध्यक्षपदाची निवडणूक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी बूथ कमिट्या, प्रदेश प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी या निवडी होतील. बूथ कमिट्यांसाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शहर प्रतिनिधी, बूथ कमिट्या, ब्लॉक अध्यक्ष यावर ज्याचे वर्चस्व असते त्याला शहर अध्यक्ष होणे सोपे असते. त्यादृष्टीने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विश्वजीत कदम हे काँग्रेसचे उमेदवार होते. ते पुन्हा पुण्यातून निवडणूक लढवणार? की सांगलीत जाणार? यावर चर्चा चालू आहे. त्यादृष्टीने कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष राहील. कदम यांना पुण्यातून उमेदवारी हवी असेल तर ते अधिकच सक्रीय राहतील. रोहित टिळक यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. परंतु त्यांच्या संदर्भात अलीकडे काही घटना घडल्यामुळे त्यांचे नाव चर्चेतून मागे गेले आहे.