जळगाव। भगवान विष्णुचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव शुक्रवारी 28 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परशुराम जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत समस्त ब्राह्मण समाज सहभागी होते. शोभा यात्रेत भगवान परशुरामाच्या जयघोषाने संपुर्ण शहर अक्षरशः दणाणुन सोडले. शोभा यात्रेत ब्राह्मण समाजातील अबाल वृध्द सहभागी होते. शोभा यात्रेला प्रारंभ होण्या आधी श्रीराम मंदीरात आरती करण्या आली. त्यानंतर शोभायात्रेस प्रारंभ झाले. श्रीराम मंदीर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प.मंगेश महाराज यांच्याहस्ते आरती करण्यात आली.
लेझीम पथकाने वेधले लक्ष
शहरात भगवान परशुरामांच्या जयंती निमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेच्या अग्रभागी महिला ढोल पथक, विविध वेशभुषा धारण केलेले ब्राह्मण समाज बांधव, पुरुष ढोल ताशे पथक सहभागी होते. दरम्यान शोभायात्रेत सहभागी असलेल्या महिला लेझीम पथकाने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले. शोभायात्रेच्या शेवटी भगवान परशुरामांचा रथ होता.
समाजातील दिग्गजांचे देखावे
भगवान परशुरामाच्या जयंती समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत ब्राह्मण समाजातील दिग्गजांचे देखावे साकारलेले बालक सहभागी होते. यावेळी भगवान परशुराम, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर, सुषमा स्वराज आदींचे वेशभुषा परिधान करुन जिवंत देखावे साकारण्यात आले होते.
बालगंधर्व नाट्यगृहात समारोप
ब्राह्मण सभेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेद्र मिश्रा, चंद्रशेखर ठसे, अशोक जोशी, मुकुंद येडके, नागेश लिमये आदी उपस्थिती होते. जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदीरापासून सायंकाळी 5.30 वाजेपासून शोभायात्रेस प्रारंभ झाले. श्री.लक्ष्मीनारायण मंदीर, सराफ बाजार, सुभाष चौक, दाणा बाजार, भवानी मंदीर, गुजरात स्विटमार्ट मार्गे शोभायात्रा बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी रात्री 8.30 वाजता पोहोचले. बालगंधर्व नाट्यगृहाजवळ शोभायात्रा विसर्जित करण्यात आली. या शोभायात्रेत समाजबांधव शिस्तबध्दरित्या सहभागी झाले होते.