धुळे (रोगेश जाधव) । शहरासह जिल्हात तापमानाने यंदा प्रथमच उच्चांक गाठला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात तापमानाने मोठी उसळी घेतली. शहरात 40 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तापमान वाढीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. रस्त्यावरून जाणार्या पादचार्यांच्या प्रमाणातही घट आहे. दुचाकी चालविणारे सनकोट, टोप्या, हातमोजे घालून फिरत आहेत. रस्त्याच्या कडेला थंडपेय, सरबत पिण्यासाठी आणि टरबुजाच्या गार गार फोडी खाण्यासाठी हातगाड्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. तापमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना गरम होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर छतावर गरगरणारे पंखे गरम हवा फेकत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांना घराबाहेर झोपण्याची वेळ आली आहे. भारनियमनामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. तापमानामुळे विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असून, त्यामुळे अनेक आजार बळावल्याचे दिसून येत आहे.
शहराला 5 दिवसाआड पाणी
धुळे मनपाच्रा ढिसाळ कारभारामुळे शहरात पाच दिवसाआड तर काही भागात आठ दिवसाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती शहरातही निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याला मागणी वाढते. यावर्षी देखील पाणीटंचाई वाढली तशी विकतच्या पाण्याला मागणी वाढली आहे. शहरामध्ये अनेकांनी पाण्याचे शुद्धीकरण करून पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. उन्हाळा वगळता या व्यवसायात बर्यापैकी उलाढाल होत आहे. मागील दोन महिन्यांपासून तर पाण्याच्या व्यवसायाला चांगलीच तेजी आली आहे. सरासरी दुप्पटीने हा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे धुळे शहरातील एकूण व्यवसायिकांची संख्या लक्षात घेता दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल पाण्याच्या व्यवसायातून होऊ लागली आहे. मे महिन्यात टंचाईची स्थिती अधिकच गंभीर होणार आहे.
धुळेसह काही तालुक्यांमध्ये तीव्र टंचाई
तापमानाचा पारा 40 डिग्रीच्यावर जाऊन पोहोचला असताना ग्रामीण भाग पाणीटंचाईने होरपळत आहे. तर दुसरीकडे मात्र शहरात पाण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे. या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून, व्यवसायातील उलाढाल दुप्पटीने वाढली आहे. ग्रामीण भागात पाणीसाठे आटले आहेत. प्रमुख प्रकल्प आणि गाव तलावांनी तळ गाठल्याने भूजल पातळीही खोल गेली आहे. परिणामी गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
लाखो लिटर पाण्याची विक्री
शहरामध्ये शुध्द पाण्याचे प्रकल्प वाढले आहेत. सुमारे 50 ते 60 छोटे मोठे प्रकल्प असून, छोट्यात छोट्या व्यावसायिकाकडून 20 लिटर क्षमतेचे दररोज किमान 200 जार विक्री होत आहेत. यातून सर्वसाधारणे अंदाज बांधला तर दिवसाकाठी पंधरा हजार जारचे पाणी शहरामध्ये पुरविले जात आहे. थंड पाण्याचा एक जार 30 रुपयांना तर थंड न करता एक जार 20 रुपयांना विक्री होतो. त्यामुळे या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. पाणी विक्रेत्यांनी व्यवसायिक दुकाने व घरोघरी पाण्याचे जार पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. उन्हाळ्यापूर्वी असलेल्या ग्राहकांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. तसेच जे ग्राहक उन्हाळ्यापूर्वी दिवसाला एक जार पाणी वापरत होते, तेच आता दररोज दोन जार पाणी वापरत आहेत. त्यामुळे शुद्ध पाण्याची मागणी वाढली आहे.