पुणे । महापालिका निवडणुकीनंतर भाजपमधील एकोपा संपेल, नेत्यांच्या महत्वाकांक्षा वाढतील आणि अंतर्गत धुसफुशिचा स्फोट होईल, अशी भाकिते केली जात होती आणि ती खरी ठरू लागली आहेत.
महापालिका समान पाणी पुरवठ्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या. या निविदेत ठेकेदारांनी संगनमत केले. त्यामुळे पालिकेचे 500 कोटींचे नुकसान होईल, असा आरोप अपक्ष पण अलीकडे भाजपशी जवळीक असलेले खासदार संजय काकडे यांनी केला. अखेरीस निविदा रद्द झाल्या. ही घटना भाजपमधील भांडणे उघड करण्यास पुरेशी ठरली.
काकडे यांचा भाजपशी संबंध काय?
महापालिकेतील पक्षाचे पदाधिकारी म्हणजे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष बावळट असल्याचे सांगत काकडे यांनी त्यांची खिल्ली उडविली. निविदा रद्द केल्याचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. लगोलग स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी टोला लगावला आणि काकडे यांचा भाजपशी संबंध काय? असा सवाल केला. निविदा रद्द झाल्याने पुणेकरांचे कोट्यवधी रुपये कदाचित वाचतील, पण सत्ताधारी म्हणून भाजपवर नामुष्कीची वेळ आली. पालिका निवडणूक होऊन सहा महिने लोटत नाहीत तोच हा दणका बसला. आणखी काही निविदा वादग्रस्त झालेल्या आहेतच. त्याचे पडसाद अजून उमटायचे आहेत.
कामाचे मूल्यमापन
काकडे यांनी त्यांच्या स्वभावानुसार थेट प्रतिक्रिया देऊन महापालिका पदाधिकार्यांना बावळट ठरवून टाकले. तत्पूर्वी पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना समजाऊन घ्या, असा सल्ला खासदार अनिल शिरोळे यांनीही महापालिका पदाधिकार्यांना दिला होताच. दोघांची भाषा वेगळी असली तरी रोख एकच होता, मतितार्थ एकच होता. मध्यंतरी पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी नगरसेवकांची कार्यशाळा घेतली होती. पक्षात फक्त नगरसेवकांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन होणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एकोपा संपला
काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या एका नगरसेवकाने सांगितले की, आम्ही वर्षभर गप्प बसणार आहोत. भाजप नेते ठरवतील तसे वागणार आहोत. पुढे बघू. याचा अर्थ ते भाजप नेत्यांचे जोखड फेकून देऊन काँग्रेस स्टाईल वागणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दिसलेला एकोपा यापुढे दिसणार नाही हे टाकी प्रकरणाने स्पष्ट झाले आहे. लोकसभेसाठी इच्छुक फार नसतील पण विधानसभेसाठी पक्षात मोठी साठमारी होईल. अनेक ज्येष्ठांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत.