‘स्थायी’ च्या कारभारावर सदस्य नाराज : शहराध्यक्षांकडे तक्रार
पुणे : स्थायी समितीच्या बैठकीपुर्वी आम्हाला एखादा विषय पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, समितीत अचानक मतदान करायला लावतात. त्यामुळे आमची अडचण होते, विषय आम्हाला समजून घेता येत नाहीत, अशा तक्रारी भाजपच्या समिती सदस्यांनी शनिवारी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडे केल्या. त्यामुळे महापालिकेत मंजूर होणार्या विषयांवरून सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
नगरसेवकांची बैठक
सोमवारी होणार्या महापालिका मुख्यसभेच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी शहराध्यक्ष गोगवले यांनी महापालिकेत पक्ष नगरसेवकांची बैठक घेतली. यात मुख्यसभेत कोणते निर्णय घ्यायचे यावर चर्चा करण्यात आली. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच काही सदस्यांनी स्थायी समितीच्या निर्णयाबाबत आक्षेप घेतला. ही समितीची बैठक होण्यापुर्वी आमची बैठक घेतली जाते. त्यात कोणते विषय करायचे कोणते पुढे घ्यायचे हे आम्हाला सांगितले जाते. त्यानुसार, आम्ही तयार असतो. मात्र, अचानक एखादा विषय पुढील बैठकीत घ्यायचा, असे ठरले असतानाच अचानक आम्हाला मतदान करण्याच्या सूचना केल्या जातात, अशी तक्रार शहराध्यक्षांसमोर केली.
कशासाठी वर्गीकरणे करता?
गेल्या काही महिन्यांपासून स्थायी समितीत होणार्या वर्गीकरणांचा विषय चांगलाच गाजत आहे. यामुळे अंदाजपत्रकाची मोडतोड होत असून भाजपला टिकेचा सामना करावा लागत आहे. मुख्यसभेच्या कार्यपत्रिकेवरही 100 हून अधिक वर्गीकरणाचे प्रस्ताव होते. त्यावर चर्चा करताना गोगावले यांनी कशासाठी एवढी वर्गीकरणे करता, अंदाजपत्रकात होतील अशी कामे सूचवा, अशा सूचनाही नगरसेवकांना केल्या.