शहर वाहतूक शाखेतर्फे शासनाच्या तिजोरीत 74 लाखांचा दंड जमा

0

जानेवारी 2018 ते मार्च 2019 या 15 महिन्यांतील कामगिरी ; ई चलनाच्या कारवाईतूनही 3 महिन्यात साडे तीन लाखांच्या वर दंड वसूल ; ई चलनाच्या जनजागृतीमुळे नागरिक पाठवाहेत बेशिस्त वाहनधारकांचे छायाचित्र

(किशोर पाटील)
जळगाव- शहर वाहतूक शाखेने जानेवारी 2018 ते मार्च 2019 या पंधरा महिन्यांच्या कालावधीत 73 लाख 93 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करुन ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली आहे. विशेष म्हणजे यात नुकत्याच जानेवारी महिन्यात उद्घाटन झालेल्या ई चलनातूनही अवघ्या तीन महिन्यात 3 लाख 31 हजार 200 रुपयाचा दंड वसूल केला आहे. शहर वाहतूक शाखेने ई चलनाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे नियमांची अंमलबजावणीकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरिक्षकपदी देविदास कुनगर यांची 3 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती झाली. वाहतूक शाखेत 114 पुरूष तसेच 8 महिला कर्मचारी आहेत. कुनगर यांच्या मार्गदर्शनाने योग्य नियोजन तसेच समन्वय साधून कर्मचारी कामगिरी करत आहेत. त्यामुळे या शाखेच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. तसेच वाहतूक शाखेतर्फे नियमांच्या अंमलबजावणीबाबत विविध कार्यक्रम तसेच फलकांव्दारे जनजागृती केली जात आहे.

नियमांचे उल्लंघन, कारवाईचा दंडुका
वाहतूक शाखेतर्फे जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 असे वर्षाची कामगिरी लक्षात घेवून त्यापध्दतीने दंडाची रक्कम शासनाकडे जमा केली जाते. रहदारीस अडथळा, परवाना नसणे, ट्रीपल सीट, रिक्षामध्ये समोर प्रवासी बसविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, दुचाकी चालवितांना मोबाईलवर बोलणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, नंबर प्लेट नसणे, चारचाकी वाहनांच्या काचांना ब्लॅक फिल्म लावणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, महामार्गावर हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल न पाळणे अशा प्रकारे नियमांची अंमलबजावणी न करणार्‍या वाहन धारकांवर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे वाहतूक शाखेने वर्षभरात बेशिस्त पार्किंग करणारी वाहने तसेच रस्त्यात अडथळा ठरणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाईचा दंडुका उगारल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्षा शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केल्या. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईमुळे रिक्षाचालकांना शिस्त लागली आहे. विविध चौकांमध्ये कार्यरत वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांकडून होत असलेल्या कारवाई तसेच तपासणी होत असल्याने नियम पाळणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही आशादायक चित्र आहे.

नवीन वर्षात तीन महिन्यात साडे बारा लाखांचा दंड वसूल
शहर वाहतूक शाखेने जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 या वर्षभराच्या कालावधीत सर्व कर्मचार्‍यांनी केलेल्या एकत्रित 39 हजार 337 केसेस करुन कारवाईतून 61 लाख 38 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2019 ते मार्च 2019 या अवघ्या तीन महिन्यात कर्मचार्‍यांनी 12 लाख 55 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करुन केला आहे. अशा प्रमाणे जानेवारी 2018 ते मार्च 2019 या 15 महिन्यांच्या कालावधीत वाहतूक शाखेने एकूण 73 लाख 93 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला असून ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली आहे.

ई चलनाव्दारे 3 महिन्यात 3 लाख 61 हजारांचा दंड वसूल
मुंबई, पुणे नागपूर यासारख्या मेट्रोसिटीप्रमाणे जळगावातही शहर वाहतूक शाखेतर्फे ई चलन कार्यान्वित करण्यात आले. 3 जानेवारी 2019 रोजी त्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ई चलनामुळे विभाग हायटेक झाला असून जानेवारी ते मार्च या अवघ्या तीन महिन्यात ई चलनाव्दारे 1 हजार 515 वाहनधारकांवर कारवाई करण्यात येवून त्याव्दारे 3 लाख 61 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नागरिकच पाठविताहेत व्हॉटस्अ‍ॅपर नियम मोडणार्‍यांचे छायाचित्र
शहरातील सीसीटीव्हीव्दारे नियम तोडणार्‍याचे छायाचित्र काढले जावून थेट त्याला त्याच्या घरच्या पत्त्यावर चलन पाठविले जाते. यानंतर वाहनधारक वाहतूक शाखेत अथवा न्यायालयात जावून दंडाची रक्कम भरतो. आता पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांच्या संकल्पनेतून ई चलनानंतर कर्मचारी थेट नागरिकांच्या घरोघरी जावून ई चलन पोहचवित असून दंडाची रक्कम वसूल करत असल्यानेही दंडाच्या रकमेचे आकडे वाढले आहे. ई चलनाच्या जनजागृतीसाठी वाहतूक शाखेने ठिकठिकाणी फलक लावले आहेत. त्याव्दारे नागरिकांसाठी व्हॉटस्अ‍ॅप चा क्रमांक देण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असून नागरिकच थेट नियम मोडणार्‍यांचे छायाचित्र व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवित आहे. थेट ई चलनाच्या यंत्रणेला व्हॉटस्अ‍ॅप जोडले असल्याने त्याव्दारे संबंधित वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे

शहर वाहतूक शाखेने कामगिरी कशी सुधारेल यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु आहेत. ई चलनामुळे दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. जनजागृतीमुळे नागरिकांचाही प्रतिसाद लाभला आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे, जेणेकरुन कारवाईचा सामाना करावा लागणार नाही.- देविदास कुनकर, पोलीस निरिक्षक, शहर वाहतूक शाखा