शहर व जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री व उत्पादनावर बंदी आणा

0

पुणे । शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या हॉटेल्स व बार रूममध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे दारू व बीअर विक्री होत आहे. तसेच विविध ठिकाणी दारूचे अवैधरित्या उत्पादन देखील करण्यात येत आहे. यावर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनचे पुणे जिल्हाप्रमुख राजेंद्र भोसले व उज्ज्वला झेंडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक फुलपगार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन संघटने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक सावरकर, निलेश जोशी, संजय बल्लारी, बळीराम वांजळे व संदीप मोरडेकर आदी उपस्थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा
शहर व जिल्ह्यात तयार करण्यात येत असलेली नकली दारू तात्काळ जप्त करावी. ज्या हॉटेल व दुकानांमधून नकली दारूची विक्री केली जाते, अशा दुकानांवर योग्य कारवाई करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात इशारा देण्यात आला आहे.

नकली देशी दारूची सर्रास विक्री
ग्रामीण भागात व शहरामधल्या झोपडपट्टी भागात राजरोसपणे हातभट्टी व गावठी दारूचे उत्पादन होत आहे. तसेच मद्य उत्पादन कारखान्याकडून विक्रीसाठी मागविलेल्या दारूवरील पॅकिंग हुबेहूब बनवून नकली देशी दारू दुकानातून सर्रास विक्री केल्याचे आढळून येत आहे. शहरातील अनेक दारू विकणार्‍या दुकानांमधून नकली लेबल लावून विदेशी विकली जात असल्याचे निर्दशनास आले आहे. अनेक ग्रामीण भागात उसाच्या फडात तसेच वांगी व मिरचीच्या मळ्यात अफू व गांजाची पिके घेतल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष वाढत आहे. तसेच विभागातर्फे अनेक हॉटेल्स, बियर बार, देशी दारूचे, गावठी दारू उत्पादन याकडे हप्ते चालू असल्याने गावगुंडांना संरक्षण दिले जात आहे. यामुळे सामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त होत असून याला काही प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभाग जबाबदार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.