शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वाहन ‘धक्कास्टार्ट’

0

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेण्याची अपेक्षा : वाढत्या चोर्‍या-घरफोड्यांमुळे घबराट

भुसावळ- रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या शहरात सद्यस्थितीत चोर्‍या-घरफोड्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असताना अप्रिय घटनांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांच्या गस्तीत महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या वाहनांची ‘चल यार धक्का मार’ अवस्था झाल्याने पोलिसांचा मनस्ताप वाढला आहे. शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यातील वाहनांची अवस्था चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडण्यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह नूतन पोलीस उपअधीक्षकांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहराला लागून गेलेला राष्ट्रीय महामार्ग, जंक्शन शहर, विविध मर्मस्थळे यामुळे भुसावळची वेगळी ओळख असलीतरी वाढत्या गुन्हेगारीमुळे संवेदनशील शहर म्हणून ओळख होवू पाहत आहे. अशा प्रसंगी अप्रिय घटना घडल्यास पोलिस प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुस्थितीत पोलिस वाहनांची नितांत गरज आहे त्यामुळे अप्रिय घटनेपूर्वीच पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

धक्का स्टार्ट वाहनामुळे पोलिसांना मनस्ताप
शहरात बाजारपेठ, शहर व तालुका पोलीस ठाणे कार्यरत आहे. यापैकी शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात संवेदनशील भाग येत असल्याने माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागते तसेच शहरातील वाढत्या घरफोडीच्या व इतर घटनांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पोलिसांना रात्री-अपरात्रीची गस्त वाढवण्याची सुचना वरीष्ठ अधिकार्‍यांकडून प्राप्त झाली असताना शहर व बाजारपेठ ठाण्याच्या वाहनांची अवस्था धक्का स्टार्ट असल्यामुळे पोलिसांचा मनस्ताप वाढला आहे शिवाय रात्री-बेरात्री धक्का मारण्यासाठी बोलवायचे कुणाला? हादेखील गंभीर प्रश्‍न आहे. पोलिसांच्या वाहनाला पोलिसच दररोज धक्का देत असल्याचे पाहून नागरीकांमध्येदेखील या प्रकाराची मिश्कीलीने चर्चा होताना दिसून येत आहे.

शहरातील पोलीस चौक्या नावालाच
संवेदनशीलशहर म्हणून ओळख असलेल्या या शहरात बाजारपेठ पोलिस ठाण्यातंर्गत तीन तर शहर पोलीस ठाण्यातंर्गत एक अशा चार पोलीस चौक्या आहेत. यामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यांतर्गत असलेली जामनेर रोडवरील वाल्मिक नगरासमोरील व बसस्थानक परीसरातील पोलीस चौकी केवळ नावालाच आहे तसेच शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गोपाळनगर पोलीस चौकीची तर मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

दुचाकीही झाल्या दिसेनाशा
पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून पोलिस कर्मचार्‍यांना गल्ली-बोळात व इतर घटनास्थळी तातडीने धाव घेता यावी यासाठी दुचाकी देण्यात आल्या आहेत तसेच गुन्हेगारीवर अंकुश निर्माण व्हावा यासाठी शहरात फेरफटका मारण्यासाठी दुचाकीस्वार पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते मात्र हे पथक आणि पोलिस प्रशासनाच्या दुचाकी आज रोजी दिसेनासा झाल्या आहेत.

पोलिसांची बंद वाहने चोरट्यांच्या पथ्थ्यावर
शहरातील विविध भागात सद्यस्थितीत घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तसेच रात्री-अपरात्री हाणामारीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. अशा प्रसंगी पोलिस कर्मचारी वेळेवर पोहचणे आवश्यक आहे मात्र शहर व बाजारपेठ पोलिसांचे वाहनच ‘दे धक्का’ झाल्याने पोलिसांना घटनास्थळी वेळेवर पोहचणे शक्य होत नसल्याने चोरट्यांचे व उपद्रवींचे चांगलेच फावले आहे. याकडे पोलिसांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.