महापालिका निवडणुकांच्या प्रचारात ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर करणार्या राज्य सरकारने अखेर विकास निधीचे पाट या शहरांसाठी खुले केले असून, पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच ठाण्यासाठी 92 तर कल्याण-डोंबिवलीसाठी 137 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकार्यांमार्फत येत्या आठवडाभरात हा निधी या दोन्ही महापालिकांकडे सुपूर्द केला जाणार आहे. या शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर केलेल्या विविध प्रकल्पांपैकी आवश्यक प्रकल्पांसाठी हा निधी वापरण्याची मुभा महापालिकांना देण्यात आली आहे. एरवी निधी नाही म्हणून शिमगा करणार्या पालिका प्रशासनाला निधी मिळालाय. मात्र, महापालिकेची मानसिकता असणे गरजेचे आहे की, या शहरांना स्मार्ट बनवले पाहिजे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहरांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ही शहरे स्मार्ट व्हावीत यासाठी जवळपास 600 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प या भागात आखले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. याशिवाय डोंबिवलीलगत कल्याण विकास केंद्राची आखणी करताना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यासाठी 1025 कोटी रुपये राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या घोषणांना वर्ष उलटून गेले तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून छदामही जमा झाला नाही. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारात शिवसेनेने या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडले. कल्याणचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना जाहीर सभांमध्ये सहभागी करून घेताना शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली होती. या पार्श्वभूमीवर निवडणुका होताच राज्य सरकारने या दोन्ही शहरांना आर्थिक निधी पुरवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. 229 कोटींचे निधी साहाय्य केले जाणार आहे.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी निवडलेल्या शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीची निवड झाली नव्हती. मात्र, स्पर्धात्मक पद्धतीने निवडण्यात आलेल्या दुसर्या टप्प्यात या दोन्ही शहरांचा समावेश स्मार्ट शहरांच्या यादीत करण्यात आला. राज्य सरकारने नुकताच पाच शहरांना या प्रकल्पातून 420 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय जाहीर केला असून यामध्ये ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या वाटयला 229 कोटी रुपयांचा निधी आला आहे. यापैकी ठाणे महापालिकेस 92 कोटी रुपये मिळणार असून, 137 कोटी रुपयांचा निधी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाची आखणी करताना केंद्र तसेच राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रकल्पांपैकी प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी हा निधी खर्च करता येणार आहे. ठाणे महापालिकेने इस्रायलच्या धर्तीवर शहरात ‘डीजी ठाणे’ प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, याशिवाय पाण्याच्या वापरावर मीटर पद्धतीचा अवलंब करण्याच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले की, महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर वाहतूकमुक्त केला जाणार आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा स्कायवॉक लवकर नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘शहराचा खाडीकिनारा सुशोभित करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. हे कामही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेत सिटी पार्कचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.
शहरातील कचर्याची समस्या सोडवण्यासाठी निविदा मागवली आहे. तिला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी दोन प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक धोरण मंजूर करण्यात आले आहे. कल्याण दुर्गाडी सहापदरी पूल आणि मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली हा खाडीपूल मंजूर झाला आहे. त्याचे विकासकाम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू केले आहे. 800 कोटी खर्चाचा रिंगरूट तयार केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे व कल्याण-शीळ एलिव्हेटेड रस्ता आणि कल्याण ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार आहे. कल्याण सर्व वाहतुकीच्या साधनांशी जोडले जाणार आहे. शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी फेरीवाला धोरण ठरवले जाणार आहे. रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. अर्धवट विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना महापालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्रांपैकी दोन प्रभाग क्षेत्रांत सुरू करण्यात येणार आहे. कल्याणमधील एक व डोंबिवलीतील एक प्रभाग क्षेत्राची 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी निवड केली जाणार आहे. 27 गावांत रस्ते विकास करण्यात येत आहे. नागरिकांना जास्तीत जास्त वेळ दिला आहे.
– श्रुती नानल
9619763724
कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी