स्वच्छतेत जळगाव शहर ७९ स्थानी ; साफसफाई होत नसल्याने नागरिकांची प्रचंड नाराजी
जळगाव : स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि हिरवेगार शहर अशी बिरुद म्हणून मिरविणारे जळगाव शहर प्रचंड अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री स्वच्छ सर्वेक्षणात देशातील 200 शहरांमधून 79 क्रमांकावर असले तरी वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. आता तर 75 कोटी खर्च करुन पाच वर्षासाठी सफाईचा एकमुस्त मक्ता दिला असल्याने शहर स्वच्छ होणे अपेक्षित असतांनाही अस्वच्छतेच्या तक्रारीच आहे. त्यामुळे जळगावकरांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत महापौर भारती सोनवणे यांच्यासमोर आव्हान ठाकले आहे. महापौर निश्चितपणे हे आव्हान समर्थपणे पेलतील अशी जळगावकरांची अपेक्षा आहे.
शहरातील साफसफाईसंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून राजकारण तापू लागले आहे. मनपाने आधी प्रभागनिहाय साफसफाईचा मक्ता दिला होता. मात्र जळगाव महानगरपालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर होवून भाजपची एकहाती सत्ता आली आणि साफसफाईचा एकमुस्त मक्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे जळगावकरांनी भाजपला कौल देवून एकहाती सत्ता दिली. त्यामुळे शहर विकासाबाबत जळगावकरांच्याही अपेक्षा उंचावल्यात. परंतु जळगावकरांच्या पदरी निराशाच पडल्याचे वास्तव चित्र असल्याचे नाकारता येणार नाही. मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर हुडको आणि जेडीसीसी बॅकेच्या कर्जातून मनपा मुक्त झाली असली तरी अनेक प्रश्न मात्र प्रलंबितच राहिले आहेत.
स्वच्छतेत जळगाव शहर 79 व्या स्थानी
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. देशातील ज्या शहरात अमृत योजना मंजूर झाली अशा 200 शहरांमध्ये जळगाव शहराचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत कचरा संकलन,वाहतूक,प्रक्रिया,कचरा विलगीकरण आणि कचरा प्रक्रिया करण्यावर भर देण्यात येत आहे. 2019 मध्ये स्वच्छतेत 200 शहरांमधून जळगाव 76 व्या क्रमांकावर होते. आधी वार्षिक सर्वेक्षण व्हायचे परंतु 2019 पासून त्रैमासिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. एप्रिल ते जून 2019 मध्ये 131 क्रमांकावर तर जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये 79 व्या स्थानी जळगावने स्थान पटकावले. ऑक्टोबर ते डिसेंबर 2019 या तीन महिन्याच्या सर्वेक्षणासाठी राज्य आणि केंद्रीय समितीने पाहणी केली असून निकाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता कागदोपत्री निकालाची उत्सुकता असली तरी शहर स्वच्छ होणे हीच जळगावकरांची अपेक्षा आहे.
स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
साफसफाई अभावी शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. किंबहुना शहरातील साफसफाईचा प्रश्न खर्या अर्थाने ऐरणीवर आला आहे. आरोग्याच्या प्रश्नावर नियंत्रण मिळवायचे असेल तर शहर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. याच हेतूने ऑगस्ट 2019 मध्ये साफसफाईसाठी 75 कोटींचा पाच वर्षासाठी वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र शहर स्वच्छतेपेक्षा अधिकच अस्वच्छ शहर दिसू लागले आहे. नागरिकांकडून कर आकारणी केली जात असतानाही साफसफाई होत नसल्याने नागरिकांसह दस्तुरखुद्द मनपाचे काही पदाधिकारी आणि नगरसेवकही रोष व्यक्त करु लागले आहेत. मक्तेदार किंवा प्रशासन साफसफाईबाबत दावा करीत असले तरी स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापौर भारती सोनवणे यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे हे खरं तर स्वच्छतेबाबत आग्रही आहेत. कारण गेल्या तीन वर्षापूर्वी त्यांनी स्वत: अख्खा शहर पिंजून काढून उद्भवलेल्या आरोग्याच्या प्रश्नावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरले होते. आता पून्हा काहीशी हीच स्थिती उद्भवली असल्याने शहर स्वच्छेतेबाबत महापौर भारती सोनवणे यांच्यासमोर आव्हान ठाकले आहे.