शहर स्वच्छतेसाठी पदाधिकारी सरसावले

0

दुभाजक चकाचक ; काही ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर


जळगाव : शहरात गेल्या पाच दिवसांपासून सफाई मक्तेदाराच्या कामगारांनी कामबंद केले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाचे पदाधिकारी सरसावले असून मनपाच्या कायम कर्मचार्‍यांच्या माध्यमातून स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दुभाजक देखील चकाचक करण्यात आले असले तरी शहरातील काही प्रभागांमध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचलेले आहेत,कचरा कुंड्या ओव्हर फ्लो झालेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान,महापौर भारती सोनवणे,स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सकाळी स्वच्छतेची पाहणी केली.

पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छतेची पाहणी

मनपाने शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र दोन महिन्याचे वेतन न मिळाल्याने मक्तेदाराने काम करण्यास नकार दिला.त्यामुळे शहरात कचराकोंडी झाली आहे. कचराकोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी गुरुवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेवून मनपाच्या कायम कर्मचार्‍यांच्या माध्यमातून स्वच्छतेचे नियोजन केले. त्यानुसार प्रभाग क्रमांक पाच मध्ये तसेच कर्मचार्‍यांचे विभाजन करुन साफसफाई करण्यात आली.तसेच घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलीत करण्यात आले. सकाळी 8 ते 8.30 वाजता दै.जनशक्तिच्या प्रतिनिधीने शहरात काही ठिकाणी पाहणी करुन वस्तुस्थिी जाणून घेतली. यावेळी भावसार सभागृह, पिंप्राळा रेल्वे गेट,शाहू नगर,बळीराम पेठ,रथ चौकात काही ठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून आले.तर शनिपेठ,शिवकॉकनी,गणेश कॉलनीत स्वच्छता दिसून आली.दरम्यान, पदाधिकारी सकाळी स्वच्छतेची पाहणी केली.