शहादा, अक्कलकुवा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

0

नंदुरबार । अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिला आणि शहादा येथील 45 वर्षीय महिला तसेच 32 वर्षीय युवकाला कोविड-19 चा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने दोन्ही शहरात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. साधारण 170 गावांना लागून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांना स्पर्श न करणे, वारंवार साबणाने हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे स्वच्छ धुणे, दोन व्यक्तीत किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे आदी उपाययोजनांवर भर द्यावा. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू

प्रशासनाने निर्जंतुकीकरण करण्यासाठी परिसरात चारवेळा फवारणी केली आहे. घरोघरी जावून वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील 13 आणि अन्य 3 संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे.

नागरिकांसाठी घरपोच सुविधा

प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी नियोजन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. वस्तू किंवा सेवा आवश्यक असल्यास मंडळ अधिकारी पी.बी.अमृतकर (9422238255), न.पालिकेचे चेतन गांगुर्डे (8275563939) किंवा पोलीस हवालदार जलाल शेख (9637587620) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गिरासे यांनी केले आहे.

प्रशासन सतर्क, परिसराचे निर्जंतुकीकरण

अक्कलकुवा शहरात तीनवेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. परिसरातील प्रत्येक घरात वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात बॅरेकेडींग केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात वाहनांना पुर्णत: बंदी केली आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर चार व्यक्तींना पूर्वीच क्वॉरंटाईन केले होते. याशिवाय प्राथमिक संपर्कातील 19 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. तर दोन व्यक्तींना अक्कलकुवा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.