शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती गजबजली

0

शहादा । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार गेल्या चार दिवसांपासून रोज शेतीमालाने भरलेल्या वाहनांनी गजबजलेला असतो. शेतीमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांचा मोठा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 4 मेपासून आतापर्यंत एकूण 500 वाहने धान्य विक्रीसाठी येवून गेल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.

अनेकांना मिळाला रोजगार
बाजार समिती सुरु झाल्याने हमाल, मापाडी व वाहनधारकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. बाजार समिती आवारात उत्साही वातावरण आहे. पहाटेपासूनच बाजार समिती आवारात वाहनांच्या रांगा लागतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने बाजारात तेजी आलेली आहे. आता बाजार समिती पूर्ववत सुरु झाल्याने शेतकर्‍यांचा हितासाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी, संघटनांनी राजकारण न करता शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे. शेतकरी हा आनंदीत झाला असून प्रशासकांचे देखील चांगले सहकार्य शेतकर्‍यांना मिळत आहे. बाजार समितीचा शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. बाजार समिती शेतकर्‍यांची आहे. म्हणून शेतकर्‍याचा चेहर्‍यावर आनंद दिसून येत असल्याची प्रतिक्रिया सचिव संजय चौधरी यांनी दिली.

शेतकरी सापडला होता संकटात
दोन वेळा बाजार समिती बंद पडल्याने शेतकर्‍यांच्या शेतीमाल घरात पडून होता. पावसाळ्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे सुरु असल्याने शेतकरी संकटात सापडला होता. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी बाजार समिती सुरु करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. व्यापारी व शेतकर्‍यांचीही बैठक घेतली होती. बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती झाली. सहाय्यक निबंधकांनी व्यापार्‍यांच्या निलंबित केलेल्या परवान्यांना स्थगिती देवून बाजार समिती पूर्ववत सुरु केली. हरभर्‍याला आज 3 हजार 771 तर गव्हाला 1 हजार 971 हा सर्वाधिक भाव दिला गेला आहे.