शहादा । येथील नगरपालिकेकडुन वर्ग करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयात एकूण 27 पदे मंजुर असतांना केवळ दहाच कर्मचारी कार्यरत असल्याने जिल्हापरिषद आरोग्य विभागाचा दुर्लक्षपणाचा कळस गाठला आहे. कर्मचार्यांचा अभावी रुग्णंना पाहिजे तशी सुविधा मिळत नाही अशी तक्रार नागरिक करीत आहेत. या ग्रामीण रुग्णांलयात अस्थापनेवर एकुण 25 पदे व कुटुंब कल्याण विभागात दोन पदे मंजूर आहेत. आज केवळ, औषध निर्माता 1 , परिचारिका 1 , ड्रेसर 1 , शिपाई 3, आया 1, कुक 1 असे दहा कर्मचारी कार्यरत आहेत.
तक्रारींची दखल नाही
शहादा नगरपालिकेचे जे कर्मचारी होते ते सर्व ग्रामीण रुग्णालयाकडे वर्ग केले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवुन मंजुर असलेली पदे त्वरीत भरण्यात यावी अशी मागणी आहे. ग्रामीण रुग्णालयात 17 पदे रिक्त असल्याने कर्मचार्यांना तीन पाळीमध्ये काम करावे लागत आहे. अपुर्या कर्मचार्यांमुळे रुग्णांना अत्यावश्यक सेवा देत येत नाही याबाबत ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे तक्रार केली असल्याची प्रतिक्रिया आरोग्य सभापती सैय्यद सायराबी यांनी दिली.
अशी आहेत रिक्त पदे
अर्धशिक्षीत कर्मचार्यांवर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरु आहे. जी रिक्त पदे आहेत त्यात वैद्यकीय अधिकारी -2 , एक्सरे टेकनिशियन-1 , मुख्य परिचारिका-1 , परिचारिका-2, दायी-1 , कॅज्युलिटी सर्वंट -1 , वाटर बेअर -1 , लॅब टेकनिशियन – 1 . लिपीक – 1 , स्टोअर किपर -1 , वॉचमन 1 , कुटुंब कल्याण परिचारिका – 1, समन्वयक – 1, रुग्णवाहिका चालक – 1 , स्विपर – 1 अशी सतरा पदे रिक्त आहेत.
सेनेची रस्त्यांवर उतरण्याची तयारी
तर सध्या असलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत कमी पडत असून नगरपालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला . ग्रामीण रुग्णालयाला शहादा शहराची लोकसंख्या बघता चांगला दर्जा द्यावा , कर्मचार्यांची संख्या उपलब्ध करावी अन्यथा नागरीकांचा मागणीसाठी रस्त्यावर उतरु अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा शिवसेना प्रमुख अरुण चौधरी यांनी दिली.