जिजाबराव पाटील / बापू घोडराज, शहादा । येथील मतदार संघाकडे जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष असते. मतदार संघात आतापर्यंत स्व.पी.के.आण्णा, डॉ.हेमंत देशमुख, ना.जयकुमार रावल यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. त्यावेळी शहादा मतदारसंघ शहादा-दोंडाईचा म्हणून होता. आता दोन पंचवार्षिकपासून शहादा मतदारसंघ शहादा-तळोदा मतदार संघ करण्यात आल्याने शहादा तालुक्याला माहेरचा आमदारच लाभला नाही. सर्व सासरवासीच लाभले. आता उदयसिंग पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. गत विधानसभा निवडणुकीत पद्माकर वळवी, राजेंद्र गावित या दिग्गजांचा पराभव करून उदयसिंग पाडवी विजयी झाले होते. जिल्ह्यासह तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे आ.उदयसिंग पाडवी यांनी काँग्रेसला खिंडार पाडत विजयी झाले होते. आता काँग्रेस तालुक्याची मदार सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्यावर होती. परंतु नुकताच त्यांचा भाजपात प्रवेश झाल्याने आता तालुक्यातील काँग्रेसचा किल्ला राखायला कोण? बालेकिल्ला राखायचे आवाहन आता काँग्रेसपुढे असणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाच्या रचनेत शहादा विधानसभा मतदारसंघ दुसर्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. पूर्वीचा शहादा- दोंडाईचा मतदारसंघ व आताचा शहादा- तळोदा मतदारसंघ आहे यात 1980 व 1985 या निवडणुकीत पी. के. अण्णा पाटील हे सलग दोन वर्षे निवडून आल्याचा अपवाद वगळता या मतदारसंघात मतदारांनी एकाच व्यक्तिल सलग दुसर्यांदा संधी दिलेली नाही. माजी कामगार राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख हे 1990 व 1999 या दोन निवडणुकीत निवडून आलेले आहेत. विद्यमान पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2004 च्या जुन्या मतदारसंघाच्या निवडणुकीतून केली आहे. तुल्यबळ लढतीत भाजपाची उमेदवारी करून त्यांनी पी. के. पाटील व डॉ. हेमंत देशमुख यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर काँग्रेस पक्षाकडून अॅड. पद्माकर वळवी हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उदेसिंग पाडवी यांचा पराभव केला होता.
2014 च्या निवडणुकीत युती व आघाडी झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यात तिहेरी तुल्यबळ लढत रंगली होती. भाजपचे उदेसिंग कोचरू पाडवी (58,556) हे अवघ्या 719 मतांनी निवडून आले होते. मोदी लाटेने त्यांना तारले. दोन नंबरवर काँग्रेसचे अॅड. पद्माकर वळवी (57,837) राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेन्द्र गावीत हे 46,966 मते घेऊन तिसर्या नंबरावर राहिले होते. या निवडणुकीत शिवसेनेकडून सुरेश नाईक (6,645), मनसे कडून किसन पवार (4,410) व सीपीआय मार्क्सवादी पक्ष कडून जयसिंग माळी (2,892) यांनीही उमेदवारी केली होती. युती व आघाडी तुटल्यामुळे शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी यांनी या निवडणुकीत उमेदवारी दखल करण्याच्या आदल्याच दिवशी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शामिल होऊन उमेदवारी केली होती. शिवसेनेचा उमेदवारच राष्ट्रवादीत चालला गेल्याने शिवसेनेला ऐनवेळी राष्ट्रवादीच्या सुरेश नाईक यांना शिवबंध बांधून शिवसेनेची उमेदवारी द्यावी लागली होती.
आजतागायत नवीन उमेदवाराला पसंती
गेल्या पाच वर्षात आ. उदयसिंग पाडवी शहादा-तळोदा मतदार संघात यांनी मोठी ताकद निर्माण केली आहे. मतदार संघातील मतदार दर पंचवार्षिक निवडणुकीतून नवीन उमेदवाराला पसंती देत असल्याचे चित्र आजतागायत पहावयास मिळते. 2014 च्या निवडणुकीपूर्वी पद्माकर वळवी आमदार होते. नंतर 2014 च्या निवडणुकीत उदयसिंग पाडवी विजयी झाले. आता मतदार कोणाला निवडून देतो, हे येणारा काळच ठरविणार आहे.
तालुका पोरका राहिल्याने विकासापासून वंचित
शहादा विधानसभा ही नेहमीच बदलत राहिली आहे. शहादा कधी तळोद्याला तर कधी दोंडाईचाला जोडले गेल्याने शहादा तालुका बर्याचवेळा पोरका राहिल्याने विकासापासून वंचित आहे. शहादा तालुक्याला नेहमीच सावत्र वागणूक मिळाली आहे. खरे पाहायला गेले तर आर्थिकदृष्ट्या शहादा हा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. त्याचे श्रेय विकासपुरुष स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांना जाते. त्यांचे राजकारण व राजकीय नेत्यावर असलेले वर्चस्व यामुळे शहाद्याचा विकास झाला. त्यांच्या काळात सातपुडा साखर कारखाना, सूतगिरणीसारखे प्रकल्प आणून रोजगार निर्माण केला. विद्यार्थ्यांचा विचार करुन ज्युनियर, सिनियर कॉलेज सोबत इंजिनिअरिंग, फार्मसी कॉलेज सुरु करुन शिक्षणाची ज्ञानगंगा आणून ठेवली. त्यामुळे शहाद्याचे नाव महाराष्ट्राला ज्ञात झाले. तोच वारसा आता त्यांचे सुपुत्र दीपक पाटील व नगरसेवक प्रा.मकरंद पाटील चालवित आहे. शहाद्याचे राजकारण याच कुटुंबाच्या अवतीभोवती फिरत असते. त्यांना मानणारा मोठा गट आहे.
मतदार संघाला आयातच उमेदवार
शहादा विधानसभेत बर्याचदा आयात उमेदवार दिले जातात. शहादा-दोंडाईचा मतदार संघ असतांना स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील हे शहादा तालुक्यातून उमेदवारी करत होते. तत्कालीन मंत्री व आमदार डॉ.हेमंत देशमुख यांनी एकवेळा तर विद्यमान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शहाद्याचे आमदार म्हणून काम पाहिले. शिवाय तळोदा मतदार संघ झाल्याने आमदारकीची सीट अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आमदारकी निभावली. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी निसटता विजय मिळविला. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस पक्षासाठी पोषक असा जिल्हा असताना नंदुरबार, शहादा हे मतदार संघ भाजपाचे असून नवापूर, अक्कलकुवा हे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.
उमेदवारांची भाऊगर्दी
तळोदा-शहादा विधानसभेसाठीचे सर्व गणित उमेदवार व युतीवर ठरणार आहे. नुकत्याच नंदुरबार येथे भाजपासाठी इच्छुक असणार्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तळोदा-शहादा मतदार संघातून विद्यमान आ.उदेसिंग पाडवी यांचे मुंबई येथे असलेले पीआय चिरंजीव राजेश पाडवी, रुपसिंग पाडवी, विद्यमान जि.प.सदस्य सुनील चव्हाण हे इच्छुक आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री पद्माकर वळवी हे एकमेव उमेदवार असल्याचे समजते. युती झाली नाही तर राष्ट्रवादीकडून राजेंद्र गावित उमेदवारी करतील. मागील पंचवार्षिकला शिवसेनेकडून डॉ.सुरेश नाईक यांनी उमेदवारी केली होती. यंदा शिवसेनेकडून प्रा. सखाराम मोते व रिना पाडवी यांनी उमेदवारी मागितली आहे. ‘वंचित’ आघाडी यावेळी रिंगणात तुल्यबळ उमेदवार देण्याचा तयारीत आहे. वंचितकडून माजी जि प सदस्य मदन मिट्या पावरा तर अपक्ष उमेदवार म्हणून सेवानिवृत्त अभियांता जेलसिंग पावरा यांनाही तयारी केली आहे. भाजपात उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्ते यांची मोर्चेबांधणी, भेटीगाठी देणे फ्लेक्स लावून आपण उमेदवारीसाठी सरस आहोत, अशी स्पर्धाच सुरु आहे. उमेदवारी कोणाला मिळते याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. पक्षातील उमेदवारी, निवडणुकीतील उमेदवार मोदी इफेक्ट विधानसभेत प्रभाव टाकतो का हे येणारा भविष्य काळच ठरविणार आहे.
दीपक पाटीलांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली
नुकत्याच झालेल्या लोकसभेला निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.हिना गावित यांना सर्वाधिक लिड शहादा तालुक्याने दिला होता. आता तालुक्याचे वरदहस्त कै.पी.के.पाटील यांचे सुपुत्र दीपक पाटील यांचा भाजपात नुकताच प्रवेश झाल्याने भाजपाला मोठी ताकद मिळाली आहे. काँग्रेसला आता गड राखण्याचे आव्हान असणार आहे. काँग्रेसचे पद्माकर वळवी आमदार म्हणून निवडून येण्यामागे शहाद्याचे दीपक पाटील यांचा मोठा हातखंडा होता. आता दीपक पाटील हे भाजपात गेल्याने पदमाकर वळवी यांना काँग्रेसचा गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.