शहादा तालुक्यात पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या ; शेतकरी चिंतेत

0

शहादा । तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आता रोज पावसाची वाट बघत आहे असे भयावह चित्र निर्माण झाले आहे. बागायतदार शेतकर्‍यांनी आधीच 15 मे ते 31 मे च्या दरम्यान कापसाची लागवड केली होती. बाहेरून अथवा ठिबक सिंचनाने पाणी दिले जात होते. त्यातच जमिनीत पाण्याची पटली खोलवर गेल्याने शेकडो बोअर कोरडे झाले आहेत. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 7 जून च्या रात्री व 6 जूनला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी कापसाची लागवड करून टाकली. तर कोरडवाहू शेतकर्‍यांनी ज्वारीची पेरणी केली. मात्र 18 जून उजाडत पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळा यावर्षी चांगला होईल शिवाय जूनचा पहिला आठवड्यात चांगली हजेरी लावेल हा अंदाज वेध शाळेचा खोटा ठरला आहे. ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात कुठेही पाऊस नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. निम्मे जून महिना संपत आहे जून महिन्यात मे हिटचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसभर कडक ऊन असते. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकर्‍यांची पावसाळ्यापूर्वी सर्व शेतीकामे संपून चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. शेतकरी अजून महागडी बियाणे खरेदी करण्याची हिम्मत करत नाही.