शहादा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

0

शहादा। तालुक्यातील म्हसावद, पाडळदा, चिखली, रामपूर या परिसरात मंगळवार 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेपासुन पावसाने जोरदार सुरवात केली. त्यामुळे भर रस्त्यावर अगदी घुडग्या एवढा पाणी वहात असल्याने सर्व परिसर जलमय झाला होता व सामान्य जनजीवन विस्कळीत होवून रहदारी बंद झाली होती. चिखली व म्हसावद परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याला मोठा पुर आला होता. पाडळदे गावातुन दोन नाले जातात एक चिखली उमर्टीकडुन येणारा व दुसरा म्हसावद जवळून येणार आहे. म्हसावद परिसरात मुसळदार पावसामुळे शेतामधील ओसंडुन वाहणारे पाणी दोन्ही नाल्याना आल्याने मोठा पुर आला होता. औरंगपूर रस्त्याला असलेल्या घरापर्यंत पाणी पोहोचले होते. माध्यमिक विद्यालयाच्या आवारात शिवाय गावातील मुख्य दरवाज्याजवळ असलेल्या हनुमान मंदिर पर्यंत पाणी होते.

2006 मधील अतिवृष्टींची झाली पुर्नरावृत्ती
2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यात चिरडे धरण फुटले होते. या धरणाचे पाणी सरळ पाडळदे गावात घुसल्याने गाव जलमय झाले होते 1200 घरे पाण्याखाली गेली होती कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते संसार उपयोगी, शेतीउपयोगी साहित्य गायी म्हैशी शेळ्या वाहुन गेल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यानी विमानातून पाहणी केली होती. नाल्याला पुर आल्याने पुराचे वाढते पाणी बघता ग्रामस्थांना 2006 च्या प्रसंगाची आठवण झाली अक्षरशः ग्रामस्थ पुराचे पाणी ओसरे पर्यंत रात्रभर जागे होते. उशीरा मध्यरात्री पुराचे पाणी ओसरले. या मुसळदार पावसामुळे दुबार पेरणी करणारे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे, या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन व मुग पिकाला आलेली फुले पावसामुळे गळुन पडल्याने शेती उत्पन्नावर परिणाम होणार आहे.