शहादा तालुक्यात रोहयोची कामे सुरू

0

शहादा:परराज्यात गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे गावागावात परत आल्याने त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. या मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील पंचवीस ते तीस गावांमध्ये सुमारे साडेतीन हजार मजुरांना हाताला काम मिळाले असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

लॉकडाऊनमुळे शहादा तालुक्यात पावसाळ्यापूर्वी सर्व शेतीची कामे व व्यवसाय ठप्प झाले होते. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना मोठ्या प्रमाणावर बसला. एप्रिल व मे महिन्यात तालुक्यात पपई व केळी ठिकाणची तोड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे यंदा या पिकांच्या खरेदीसाठी व्यापारीच न आल्याने झाडावरच पिके खराब झाली. संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. अशातच कामे नसल्याने हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच परराज्यात गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे गावागावात परत येण्यास सुरुवात झाली होती. या मजुरांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मजुरांना त्यांच्यात गाव परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. पंचायत समिती, वनविभाग व कृषी विभागामार्फत या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती.
*वृक्ष लागवडीच्या कामांना प्राधान्य*

शहादा वनविभागांतर्गत मानमोडे, धांद्रे, वडगाव, विरपुर, शहाणे, पिंपरी, नवागाव, विरपुर, उभादगड, चिंचोरा या गावालगतच्या परिसरात वृक्ष लागवडीच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. पंचायत समितीमार्फत व कृषी विभाग यांच्या अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात आली.अंबापूर, आडगाव, धांद्रे,जाम, जवखेडा, तीधारे, कलमाडी, खापरखेडा,खरगोन, शोभानगर,लंगडीभवानी, रामपूर, सोनवलतर्फे शहादा, कवळीथ, वडाळी, लोंध्रे,गणोर, बिलाडी तसा,गोगापुर, आदी गावांमध्ये गाळ काढणे, शोषखड्डा करणे आदी कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जात आहेत. या कामांवर सुमारे तीन ते चार हजार मजूर असल्याची माहिती गटविकास अधिकारी सी. टी.गोसावी यांनी दिली.