शहादा ते दोंडाईचा या प्रमुख रस्त्यापैकी सारंगखेडा पुलापर्यंतच्या रस्त्याची तीन वर्षापासून वाताहत झाली
शहादा, ता. 25: शहादा ते दोंडाईचा या प्रमुख रस्त्यापैकी सारंगखेडा पुलापर्यंतच्या रस्त्याची तीन वर्षापासून वाताहत झाली आहे. मात्र, आतापर्यंत याकडे बघायला कुणालाही वेळ नव्हता. त्यातच पुलाच्या भराव वाहून गेल्याने पुलाला भगडद पडले. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचा प्रतिक्रिया याला लागल्या. अन् स्थानिक राज्यकर्ते जागे झाले. कामाचे काहीही देणे घेणे नसल्याच्या भावनेतून श्रेयवादाची नवी मालिका सुरू झाली असल्याचे दिसून येते. काम कोणामुळे झाले किंवा भविष्यात ते कसे होणार याची माहिती नागरिकांना नको आहे. तर आज रस्ता वाहतुकीसाठी दर्जेदार कामाची अपेक्षा नागरिक करीत आहेत . तेथे मात्र आश्वासनपलिकडे नेते व अधिकारी काहीही बोलायला तयार नाही हाच खरा कळीचा मुद्दा ठरला आहे.
रस्ता व पुलाची दुर्दशा बघून म्हणावेसे वाटते की,
कोण होतास तू,
काय झालास तू…..
दोन राज्यांचा दुवा ठरलास तू,
विकासाचा मार्ग ठरलास तू.
नव्या आशेने व नव्या दिशेने
वाटचाल करताना सोबत होतास तू.
कोण होतास तू,
काय झालास तू….
राजकारणातील हेवादावा आणि
टक्केवारीच्या गराड्यात
सापडलास तू,
अन् आज काय झालास तू.
कोण होतास तू,
काय झालास तू….
तुझ्या विकासाच्या नावावर
अनेकांचे भरण पोषण केलेस तू,
मात्र, आता स्वतः सोबत आम्हालाही अधोगतीचा मार्ग ठेवलास तू…
शहादा ते दोंडाईचा या प्रमुख महामार्गपैकी सारंगखेडा पर्यंतच्या रस्त्याची तीन वर्षापासून वाताहत झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे ठरले आहे. अनेक वेळा आंदोलने झालीत, मात्र किरकोळ दुरुस्ती केली गेली. तरी रस्ता नेहमीच वाहतुकीचा अयोग्यच राहिला. या रस्त्यावरून अवजड वाहनांची नेहमीच रेलचेल असते. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यात कामावरून एकमेकांवर चालढकल सुरू झाली. जी कामे केली गेले ती अत्यंत सुमार दर्जाची असताना किती निधी वापरला गेला हे गुलदस्त्यातच राहिले. तालुक्यातील बहुतेक रस्ते टक्केवारीच्या गराड्यात निकृष्ट दर्जाची होत असल्याची चर्चा सर्व दूर आहे. मात्र एकही लोक प्रतिनिधी यावर अवाक्षर काढत नाही.
स्थानिक राज्यकर्त्यांनी या रस्त्यावरील प्रवासाचा अनुभव अनेकवेळा घेतल्यावरही त्याकडे बघायला व चार सहा महिन्यात या रस्त्याची वाट का लागते यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरायला वेळ मिळालेला नाही. या रस्त्यांची मोठया प्रमाणावर चाळण झाल्यामुळे ऊस उत्पादकांना कारखान्यापर्यंत ऊस पोहचविण्यासाठी तसेच शेती मालाची वाहतूक करताना तारेवरची मोठी कसरत करावी लागते. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. तसेच काहीवेळा अपघात होवून निष्पाप शेतकरी व मजुर जायबंदी होतात किंवा अपघाती निधन पावतात. काही अनुभवी लोकांनी सांगितले की, महाराष्ट्रातील प्रमुख निष्कृष्ठ रस्त्यापैकी एक हा रस्ता आहे. या रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहतूकदार व्यावसायिक सारेच बेजार झाले आहेत.
सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुल दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून या पुलाने वेगवेगळ्या समस्या नोंदविल्या आहेत. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक वेळा ओरड झाली. या पुलाच्या दुरुस्तीच्या माध्यमातुन निधी गिळण्याचाच प्रकार झाल्यामुळे आज पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली व त्याचे दुष्परिणाम दिसून आले. मात्र सध्या निधी गिळणाऱ्यांना वाचविण्याचे प्रकार घडत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे पुन्हा या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करुन जैसे थे प्रकारे काम करून मोकळे होण्याचा मार्गावर आहेत. पुलाला पडलेल्या भगदाडानंतर वाहतूक बंद होऊन आठवडा झाला. परंतू या घटनेची पाहणीसाठी करण्यासाठी साधी भेटही स्थानिक राज्यकर्त्यानी व जिल्हयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. ही घटना रात्री झाली असती तर किती प्रवाशांचे जीव गेले असते याची साधी चर्चा करताना जीवाचा थरकाप होतो. याबाबत स्थानिक प्रमुख अधिकारी व राज्यकर्ते अनभिज्ञ आहेत का असा खोचक प्रश्न उपस्थित होत आहे.
पाहणीही न करता
नेते सरसावले श्रेयासाठी…
शहादा ते सारंगखेडा रस्ता आणि तापी नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्यासंदर्भात चर्चा होते. काहींनी वेळोवेळी धरणे आंदोलने केली. पण आश्वासन आणि किरकोळ डागडुजी करणे व्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही. अन्य जिल्ह्यातील रस्त्यांसाठी तातडीने निधी मंजूर होवून दर्जेदार कामे होतात. पण या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मागितलेल्या निधीची फाईल कुठे अडकते हेच समजायला मार्ग राहिलेला नाही. त्यातच निर्वाढलेल्या रिंग फेमस ठेकेदारांकडून दर्जेदार रस्त्यांची अपेक्षा आता राहिलेली नाही. काहीवेळा अधिकारीच भागीदारीत कामे करीत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. हे थांबले तरच चांगला रस्ता होवू शकतो हे त्रिकालाधीत सत्य येथे ठरले आहे.
रस्ता व पुला संदर्भात तांत्रिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नेत्यांकडून श्रेय घेण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. अपवाद वगळता कोणताही नेता अद्याप घटनास्थळी पोहोचलेला नाही. तसेच तीन वर्षांपूर्वी तीन ते चार कोटींचे काम केली गेलीत ते एका रात्रीत अल्पशापुरात वाहून जातेच कसे याची साधी चौकशी करण्याची घोषणाही कोणत्याही राजकीय नेत्याने केलेले नाही यातच खरी गोम आहे. मात्र नव्याने निधी मंजूर करत दुरुस्तीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे. काम कोणामुळे झाले किंवा होणार आहे याचे श्रेयसूतक आता नागरिकांमध्ये राहिलेले नाही. हे थांबायला हवे. त्याऐवजी दर्जेदार काम करण्याचे धारिष्ट्य नेत्यांनी दाखविले तर नागरिकांकडून आपोआप श्रेय दिले जाईल याचे भान आता राखायला हवे.