शहादा परिसरात वाळूचे ठेके पडद्याआडून सुरुच !

0

शहादा । एकीकडे शासनाने रेतीचे सगळे ठेके बंद केलेले असतांनाही महसुल विभागाच्या संगनमताने वाळूची सर्रास वाहतूक होतांना दिसत आहे. अमाप उपसा करुनही या वाळू ठेकेदारांचे पोट मात्र अजूनही भरलेले नाही आणि यामुळे पर्यावरणाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे.

शहादा तालुक्यातील बामखेडा आणि नांदरखेडा येथील वाळूचे झोन शासनाने मंजूर केले होते. या दोन झोनमधून ठेकेदारांनी सुरुवातीच्या 15 दिवसातच ठरवून दिलेला साठा उपसून घेतला आणि त्यानंतरही त्यांनी उपसा सुरुच ठेवला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हे वाळूचे ठेके बंद करण्यात आले. मात्र हे फक्त कागदोपत्रीच बंद असल्याचे सर्वश्रुत आहे.

नवीन तहसिलदारांनी लक्ष घालावे
वाळूचे ठेकेदार एवढे निर्ढावलेले आहेत की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचाही अवमान करण्यास घाबरतांना दिसत नाही. सर्रास वाळूचा उपसा सुरु असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहेत. या वाळू ठेकेदारांची मुजोरी एवढी वाढली आहे की, हे ठेकेदार नाशिक आणि मुंबईला तर जास्तीचा पैसा घेऊन वाळू पुरवित आहेत मात्र स्थानिक लोकांना डावलण्यात येत असल्याचे स्थानिक वाळू वाहतूकदारांकडून बोलले जात आहे. शहादा शहरात तसे बघितल्यास महसुल विभाग अशा व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात प्रसिद्धच म्हटला जातो. कारण संपूर्ण शहादा तालुक्यात शेकडो वीटभट्ट्या बिनबोभाटपणे सुरु आहेत. एकाही वीटभट्टीला परवानगी दिलेली नसतांनाही सर्रास हजारो ब्रास माती या वीटभट्टी चालकांनी नष्ट केलीआहे. आता नवीन तहसिलदारांनी तरी स्वत:च्या कर्तव्याचे भान ठेवून या वाळू ठेकेदारांवर तसेच वीटभट्टी चालविणार्‍यांवर कारवाई करुन दाखवावी. जेणेकरुन सामान्य जनांचा या खात्यावरचा उडालेला विश्‍वास परत येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.