शहादा बंदला व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
शहादा:-    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहर बंदची हाक दिल्यानंतर व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्‍यांना हरभरा खरेदी करतांना हमी भावापेक्षा कमी भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला त्या निषेधार्थ शहर बंदचे सोमवारी आवाहन करण्यात आले होते.   सकाळपासून शहरातील दुकाने हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःहुन बंद ठेवले होते. अत्यावश्यक सुविधा शाळा महाविद्यालये बसेस सुरु होत्या. बसस्थानक परीसर, पुरुषोत्तम मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील धान्य खरेदी-विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची दुकाने बंद होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शुकशुकाट होता. बंद शांततेत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष वसंत पाटील, सचिन पाटीलसह कार्यकर्ते शहरात फिरुन बंदचे आवाहन केले.
संघटनेचे उपोषण  कायम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्यांचे घनश्याम चौधरी यांचे नेतृत्वाखाली तिसर्‍या दिवशीही तहसिल कचेरीजवळ उपोषण सुरूच होते त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदाराना दिले आहे. शहरात पोलीस निरिक्षक संजय शुक्ल यांनी चौका चौकात व सवेदनशील  भागात पोलीस बंदोबस्त लावला होता. गेल्या दोन महिन्यात तिसर्‍यांदा शहादा बंद झाल्याने व्यापार्‍यांसह व्यावसायीकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. आता शेतकरी ही रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची मोठी कसरत होत आहे.