शहादा । येथील बसस्थानक ते पुरषोत्तम मार्केटपर्यंतचा मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने विद्यार्थी व वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. पालिकेने तातडीने रस्ता दुरूस्ती करणे गरजेचे आहे. बसस्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात लहान मोठे अपघात होत असतात. खेडावरून असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यांनाही बसस्थानकावरूनच शाळा महाविद्यालयात जावे लागते. पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेले पाणी विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. वाहनाने उडविलेले पाण्याला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
खड्यांमुळे बसचालकांना तारेवरची कसरत
बसस्थानकाकडे येणारा मुख्य मार्ग असल्याने दररोज शेकडो बसेस या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र खड्यांमुळे बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच या रस्त्यावरील खडी निघालेली असून वाहनांच्या टायरखाली आलेली खडी उधळून अनेकांना इजा होत आहेत. दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र खड्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक वारंवार विस्कळीत होत. रोज किरकोळ वाद सूरू असतात. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बसस्थानका समोरील खड्यांची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.