शहादा । येथील पंचायत समिती बांधकाम विभागातील सेवा निवृत्त वरिष्ठ लिपीक सतीश सदाशिवराव वाणी (वय 61) यांच्या उष्माघाताने आज पहाटे उपचार घेत असतांना निधन झाले. शहरात उष्मतेचा पारा 41 अंश पर्यंत पोहचला आहे. उष्णतेने जिल्ह्यात पहिला बळी घेतला आहे. जुना मामाचे मोहिदा रोड लगत ब्रम्हसृष्टी वसाहत आहे त्यात सतीश सदाशिवराव वाणी हे पत्नी व कुटुंबासह राहतात गत दोन वर्षापुर्वीच प. स. बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक पदावरुन सेवा निवृत्त झाले होते. गेल्या दोन दिवसापुर्वी मंगळ चतुर्थी चा दिवशी दुपारी प्रकाशा येथुन बँकेतुन पैसे काढुन बुधावल येथे श्री गणेशाच्या दर्शनासाठी गेले होते. भर उन्हात गेल्याने दुसर्या दिवशी त्रास झाला होता.
पाच ते सहा रक्ताच्या उलट्या
अगोदरच पायासाठी सुरत येथील दवाखान्याची औषधी सुरु होते. बुधवारी दुपारी मध्यान भोजन झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी खाजगी कामानिमित्त शहरात गेले. काम उरकुन घरी परतले असता पाच मिनिटांतच त्यांनी गोळ्या घेतल्या. दिड ते दोनच्या सुमारास अचानक त्यांना मोठी उलटी झाली. घरात त्यांचा पत्नी प्रमिला शहा उपस्थित होत्या. त्यांचा लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करीत शेजार्यांना जमा केले. डॉ. जगदीश पाटील यांनी तपासणी केल्यानंतर शहरातील खाजगी रुग्णालयात नेले. त्यादरम्यान रक्ताचा पाच सहा उलट्या झाल्या होत्या. सायंकाळी त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचाराकरिता धुळे येथे हलविले. धुळे येथे उपचारा दरम्यान मध्य रात्री दिड वाजेचा सुमारास सतीश वाणी यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सायंकाळी शहादा अमरधाम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांचे पश्चात तीन भाऊ , पत्नी , दोन मुली , जावाइ असा परिवार आहे . त्यांच्या या अचानक निधनामुळे हळ हळ व्यक्त होत आहे