शहादा । शहरातील तिसर्या टप्प्यातील नवव्या दिवसाचे गणेश विसर्जन आज रोजी दुपारी 1 वाजेपासुन सुरु झाले. एकूण 13 गणेश मंडळानी विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतला असून आज मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद हा सण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासुनच चार रस्त्यांपासून जामा मशिदीकडे जाणार्या रस्त्यावर वाहतुक बंद करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत मिरवणूका शांततेत सुरु होत्या.
गुलालाचा साचला थर
खबरदारी म्हणून गणेशोत्सवाचा विसर्जन मिरवणूका व बकरी ईद सण बघता जामा मशिद चौक, क्रांती चौक ,आझाद चौकात ज्यादा पोलीसांची कुमक बदोबस्तांसाठी लावण्यात आली होती. विशेष म्हणजे शहरात दिवसभर पोलीसांची गस्त सुरु होती. आज चार मंडळांनी समावेश विसर्जन केले. त्यात चार मंडळे मोठी आहेत. गणेश भक्तांची संख्या मोठी असल्याने पोलीसांना चांगलीच कसरत करावी लागली आहे. जनता चौक, महात्मा गांधी पुतळा , चौधरी गल्ली भागात अक्षरशः गुलालाचा थर साचला आहे. नगरपालिकेने ठिकठिकाणी पाण्याचे टँक उभे करुन पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
18 फुटी बाहुबली गणेशमुर्ती ठरली आकर्षण
मंडळांमार्फत भंडारा व प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. जामा मशिद चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी महारु पाटील प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर,मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, तहसिलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,विद्युत वितरण कंपनीचे मोरे तळ ठोकुन होते. बजरंग गणेश मित्र मंडळाने आणलेली 18 फुट उंचीचा बाहुबली देखावा असलेली गणेश मुर्ती तसेच राम राम गणेश मंडळाने आणलेली दिड लाख रुपये किमतींची मुर्ती आजचा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. विसर्जन मिरवणुकीत सर्वात मोठ्या चौधरी गणेश मित्र मंडळाचा सहभाग होता. आजचा विसर्जन मिरवणुकीत ज्या 13 गणेश मंडळाच्या सहभाग आहे त्यात त्रिमूर्ती गणेश मंडळ, श्री राम राम गणेश मंडळ , जय श्री राम गृप गणेश मित्र मंडळ, भवानी गणेश मित्र मंडळ, जय बजरंग गणेश मित्र मंडळ, चौधरी गणेश मित्र मंडळ, सिंधीराजा, जय शिवाजी राजा, संत सेना गणेश मित्र मंडळ , हिदु हृदयसम्राट, राम राम गणेश, शिव गृप गणेश, श्रीराम शैक्षणिक क्रिडा व सांस्कृतिक मंडळ या मंडळाच्या समावेश आहे.