शहादा । पोलीस स्टेशनला स्वतंत्र शाखा कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यात नंदुरबार नंतर शहादा शहरातच स्वतंत्र वाहतुक नियंत्रक पोलीस शाखा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक म्हणून पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्याच्यासोबत एकुण 10 पोलीस कर्मचार्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
सध्या चार पोलीस कर्मचारी आहेत उर्वरित 6 पोलीस कर्मचारी नंदुरबार येथुन येणे बाकी आहे. पोलीस स्टेशन आवारातच वहातूक पोलीस शाखेचे कार्यालय देण्यात आले आहे. त्याचे रंगकाम सुरु आहे. या विभागासाठी स्वतंत्र पोलिस गाडी देण्यात आली आहे. शहादा शहराचा वाहतुकीचा प्रश्न हा गेल्या चाळीस वर्षापासून कायम आहे. रस्त्यावरीलवाहने, अवैध प्रवासी वाहतुक करणारे वाहने यांचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळचा वेळेला तर वाहन चालवणे कठीण होते. हातगाडी वाले तर सकाळपासून रस्ते काबीज करतात धक्का लागल्यावर वाद होतात. एकमार्गी वाहतूक कुचकामी आहे. पोलीस यंत्रणा बघ्याची भुमिका घेतात हा सर्व प्रकार बघता स्वतंत्र पोलीस वाहतुक शाखा कार्यान्वित झाल्याने रहदारी सुरळीत होईल. रोज मुख्य रस्ते मोकळे होतील अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत. मात्र ही शाखा मृगजळ ठरु नये अशी अपेक्षा आहे.