शहादा येथे 13 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन

0

नंदुरबार । विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे 13 वे विद्रोही साहित्य संमेलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे होणार आहे अशी माहिती साहित्य चळवळीचे कार्यध्यक्ष धनाजी गुरव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कविवर्य वाहरू सोनवणे,गौतम कांबळे,चंद्रशिंग बर्डे,रंजना कान्हेरी आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाची भूमिका मांडतांना ते म्हणाले की, देशात आदिवासी, दलीत यांच्यावर अन्याय होत आहे,त्यावर आवाज उठविण्यासाठी शहादा येथे या विद्रोही साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन हे संकुचित विचारसरणीचे राहते. देणगी देणार्‍यांच्या शरण जाऊन ते संमेलन भरविण्यात येते. हा प्रकार मात्र विद्रोही साहित्य संमेलनात राहत नाही. ज्या दिवशी शासनाचे अनुदान बंद होईल त्या दिवशी ते साहित्य संमेलन देखील बंद पडणार अशी टीका यावेळी करण्यात आली. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. दोन दिवशीय संमेलनात आदिवासी संस्कृतीचे मुल्य व व्यवस्था या विषयावर विचार मंथन केले जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील विचारवंत सहभागी होतील, असे यावेळी सांगितले.