शहादा सारंगखेडा ,शहादा शिरपूर, शहादा जयनगर या रस्त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, संघटना, सर्वसामान्य नागरिक आंदोलन

शहादा,दि.२ : शहादा सारंगखेडा ,शहादा शिरपूर, शहादा जयनगर या रस्त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, संघटना, सर्वसामान्य नागरिक आंदोलन करीत आहे.परंतु राज्यकर्त्यांकडून विरोधक श्रेय घेण्यासाठी आंदोलन करीत आहेत. अशा प्रकारचे विधान करून लोकांचा व नागरिकांचा मोठा अपमान करण्यात आला आहे. वास्तविक पाहता आजपर्यंतचे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांनी केले आहे. मग नेमके विरोधक कोण हे राज्यकर्त्यांनी जाहीर करावे असे सांगत हा रस्ता चार पदरी होवो की काँक्रीट चा होवो परंतु सध्या रहदारीयुक्त रस्ता व्हावा ही अपेक्षा आहे.परंतु राज्यकर्त्यांकडून बेजबाबदार वक्तव्य करून दिशाभूल करण्याच्या प्रयत्न असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. आमची लढाई प्रशासनाच्या विरोधात आहे.या रस्त्यांसाठी (ता.५) ला गुरुवारी मोठे जन आंदोलन उभे राहणार असून नागरिकांनी शहराच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा येथे सकाळी नऊ वाजेपर्यंत एकत्रित यावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी केले आहे. या आंदोलनाला शहादा तालुका पत्रकार संघ व शहादा तालुका व्हाईस ऑफ इंडिया तर्फे पाठिंबा जाहीर केला.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी तालुक्यातील शहादा शिरपूर, शहादा सारंगखेडा ,शहादा जयनगर या दुरावस्था झालेल्या रस्त्यांबाबत पाच तारखेला होणाऱ्या जन आंदोलनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. श्री पाटील पुढे म्हणाले की,

रस्त्यांचे आंदोलन करून विरोधक श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे वक्तव्य राज्यकर्त्यांचे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून गेल्या तीन वर्षापासून या रस्त्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,विविध संघटना, सर्वसामान्य नागरिक सातत्याने आंदोलन करीत आहेत. नेमके आत्ताच का या राज्यकर्त्यांना जाग येऊन आंदोलनाकर्त्यांवर आरोप करण्याचे सुचले. सारंगखेडा पुलाला भगदाड पडायला अनेक दिवस झाले परंतु अद्यापही जिल्ह्यातील खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी साधी भेट देऊन पाहणी केली नाही. या पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे .त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. राज्यकर्त्यांना तालुक्यातील रस्त्यांबाबत कोणतीही गांभीर्य नसल्याच्या घनाघाती करत पाच ऑक्टोंबर ला रस्त्यांसाठी मोठे जन आंदोलन होणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 

 

विरोधक कोण जाहीर करावे?

गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. यात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, संघटना, सर्वसामान्य नागरिक आंदोलन करीत आहेत. मग नेमके सत्ताधाऱ्यांचे विरोधक कोण ? हे त्यांनी नावानिशी जाहीर केले पाहिजे किंवा आंदोलन करणाऱ्यांवर श्रेय घेण्याचे विधान चुकून झाले असे राज्यकर्त्यांनी सांगावे अशी मापक अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विविध स्तरातून पाठिंबा…..

प्रशासनाच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाल्याने निष्पाप बळी जात आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह सर्वांच्या जिव्हाळ्याच्या रस्त्याच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, संघटना ,सोशल ग्रुप, डॉक्टर असोसिएशन,विविध पत्रकार संघटना, सर्वसामान्य नागरिक सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून पाच तारखेला सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ ते वनभवन येथे होणाऱ्या आंदोलनाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे.