शहादा न्यायालयाचा निकाल : कारवाई टाळण्यासाठी स्वीकारली होती 20 हजारांची लाच
नंदुरबार- शहादा विभागात कार्यरत कर्मचार्याने तालुक्यात मोहिदे येथे वीज चोरीच्या केसेस केल्या होत्या तर अॅसेसमेंट सीट चुकीचे बनवल्याने चार्जशीट मिळून पगारवाढ थांबू शकते, अशी धमकी देत कारवाई टाळण्यासाठी 20 हजारांची लाच शहादा विभागाचे वीज वितरण कंपनीचे तत्कालीन उपदक्षता अधिकारी जितेंद्र चंद्रकांत मिसाळ (44) यांनी स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध नंदुरबार एसीबीने सापळा रचून कारवाई केल्याची घटना 14 फेब्रुवारी 2014 रोजी घडली होती. या प्रकरणी शहादा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर चार वर्ष खटल्याचे कामकाज चालल्याने मिसाळ यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.के.एल.व्यास यांनी आरोपीस सात वर्ष शिक्षा व 50 हजारांचा दंड सुनावला.
चार वर्षानंतर खटल्याचा निकाल
वीज कंपनीतील कर्मचारी असलेल्या तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शहाद्यातील हॉटेल नंदनवनमध्ये सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली होती. शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यास एसीबीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक ए.जी.वडनेरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारतर्फे सरकारी वकील अॅड.जसराज एन.संचेती यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव, कॉन्स्टेबल सचिन परदेशी यांनी काम पाहिले.