शहाद्यातील लाचखोर पिता-पूत्रांना पोलीस कोठडी

0

नंदुरबार: गावठाणच्या जागेचे मोजमाप करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेणार्‍या लाचखोर पिता-पूत्रांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी प्रकाशा (ता.शहादा) येथे रंगेहाथ अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जागा मोजमापासाठी लाचेची मागणी
आडगाव येथील गावठाण जागेचे मोजमाप करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केल्यानंतर शहादा येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात परीरक्षण भूमापक सुभाष साबळे यांनी शंभर ग्रामस्थांच्या घराचे मोजमाप करण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये लाच मागितली होती तर तडजोडीत ही रक्कम 300 रुपये ठेवली. तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून लाचखोर बाप-लेकांना अटक केली हेाती. भूमापकास सुभाष साबळे व त्याचा मुलगा सुदर्शनसिंग साबळे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना रविवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुभाष साबळे यांना 2015 मध्येदेखील लाच घेताना अटक करण्यात आली होती तर हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतानाच त्यांना पुन्हा एसीबीने रंगेहाथ पकडले. तपास एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक करूणाशील तायडे व पोलीस निरीक्षक संगीता पाटील करीत आहेत.