नंदुरबार : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातून टँकर चोरी करणार्या म्होरक्याला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. संशयीताच्या ताब्यातून चोरी गेलेले 45 लाखांचे दोन टँकर जप्त करण्यात आले. बलविंदरसिंग बलदेवसिंग (रा.काले, ता.पिथीपिंड, जि.तरण तारण, पंजाब) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग हा पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
चालकांनी लांबवले टँकर
तक्रारदार सुनीलसिंग काला (धानेगांव, ता.नांदेड) या ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाच्या टँकरवर दोन टँकरवर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग व बलविंदरसिंग बलदेवसिंग (दोन्ही रा.अमृतसर पंजाब) हे चालक होते तर लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यात विविध खांडसरीमधून मळी वाहण्याचे काम टँकरद्वारे केले जात होते मात्र 26 फेब्रुवारी 2022 रोजी दोन्ही चालकांनी टँकरसह पोबारा केल्याने त्यांच्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व एपीआय संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने वेषांतर करून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर दुसरा पसार झाला. धुळे जिल्ह्यातील पिंपळने-ताहराबाद रस्त्यावरील पाटील ढाब्यामागून दोन्ही टँकर जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी नंदुरबार पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दीपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.