शहाद्यात अधिकार्‍यांना नोटीसा

0

शहादा । येथील पंचायत समिती मधील लघुसिंचन उपविभागातील कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणार्‍या 10 कनिष्ठ अभियंत्यांना गटविकास अधिकार्‍यांनी कारणे दाखवा नोटीसा बजाविली आहे. अशाप्रकारे कार्यालयीन वेळेत कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीत कार्यालयातील वस्तु गहाळ होऊन शासकीय अनामतीचे नुकसान होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. नोटीस मिळाल्या पासून 24 तासाच्या आंत समाधानकारक खुलासा उपअभियंता यांचेमार्फत सादर करणेत यावा अन्यथा महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम, 1937 मधी नियम, 3 अन्वये शासकिय कारवाई करण्यात येईल असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहेत.

नोटीसीचा आशय असा
दिनांक 29/12/2017 रोजी ठिक 2.30 वा. पं.स.सभापती यांनी लघुसिंचन व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहादा येथे भेट दिली असता विभागात कोणीही कर्मचारी नसल्याने कार्यालयात महत्वाचे दप्तर, संगणक कार्यालयीन साहित्य उघड्यावर पडुन असल्याचेही नोटीसीत नमुद केले आहे. क. अभियंता पी. एम. मरसाळे, ए. एस. पाटील, आर. डी. जाधव, के. आर. भोई, एन. आर. खैरनार, वाय. व्ही. सोनवणे, डी. आर. बाविस्कर, एल. ए. बोरदे, एम. पी. बिब्बे, ओ. एच. गिरासे यांना या नोटिसा बजावण्यात आले आहेत.

मौल्यवान साहित्य उघड्यावर…
वास्तविक पहाता कर्मचार्‍यांची कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते 5.45 असुन चहापान व जेवणासाठीची वेळ दुपारी 1.30 ते 2.00 असुन याबाबत वरिल परिपत्रकान्वये कार्यालयास अवगत करणेत आलेले असुन देखील कर्मचार्‍यांनी याबाबत दखल न घेता जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले आहे. कार्यालयात अंगणवाडींना वाटप करावयाचे पोषण आहार, सौर कंदिल व त्यासंबधित इतर साहित्य, तसेच कार्यालयात वापरावयाचे संगणक, लॅपटॉप, प्रिंटर व इतर महत्वपुर्ण व मौल्यवान साहित्यदेखील उघड्यावर होते.

अधिनियम10 च्या (2) (3) चे उल्लंघन
शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 अन्वये दि. 25/5/2006 च्या अधिसूचनेन्वये दि. 1/7/2016 अन्वये अधिनियमातील प्रकरण तीन मधील कलम 8 ते 12 नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याला नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधीत असलेली शासकिय कर्तव्ये किंवा शासकिय काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडण्यासाठी कायदेशीररित्या बांधील अहे. उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण तीन मधील कलम 10 च्या पोस्ट कलम (2) व (3) चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे.