शहाद्यात एटीएम बंद असल्याने नागरिक त्रस्त

0

शहादा । शनिवार, रविवारी बँका बंद असल्याने शहाद्यात गेल्या दोन दिवसापासूनच आर्थिक व्यवहार बंद आहे. यामुळे खेड्यातून येणार्‍या तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. आठवडे बाजारासाठी शहाद्यात येणार्‍या नागरिकांना खासकरून अधिक त्रास होत आहे. शहरातील जवळपास सर्वच एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तासनतास बँकेत रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. एटीएम मशिनमध्ये अनेक वेळा नोटाच नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. याबाबत बँकेत मॅनेजरला विचारले असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बँकेत कर्मचा-यांच्या प्रमाणात खातेधारकांची संख्या अधिक आहे. पैसे काढणारे खातेदार व सर्व प्रकारचा भरणा करणा-या ग्राहकांची गर्दी असते. एटीएम मशीन बंद असल्यास या गर्दीत अधिकची भर पडते. अशा वेळी बँकेत उभे राहायला देखील जागा नसते. वृध्द लोकांचे अधिकच हाल होतात.