सीसीटीव्ही फुटेजवरून तीन संशयित ताब्यात
शहादा- शहरातील बागवान गल्लीतील घराचे भरदुपारी कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 14 लाख 50 हजार रुपये लांबविले. ही काल सोमवारी घटना घडली. या प्रकरणी तीन संशयितांना सीसीटीव्ही फुटेजवरून ताब्यात घेण्यात आले. येथील मोहंमद हारून मोहंमद हुसेन खात्री यांचे गाधी पुतळ्यालगत गोल्डन रेडिमेड नामक कापड दुकान आहे. त्यांनी काल सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे 10 वाजता कापड दुकान सुरू केले. त्यानंतर दुपारी जेवणाचा डबा घेण्यासाठी ते घरी गेले. त्यानंतर पुन्हा सहा वाजेच्या सुमारास दुकानात आले. ते रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घरी गेले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सामान फेकून कपाटातील तिजोरीत ठेवलेले दोन डब्यातील 14 लाख 50 हजार रूपये चोरून नेले. त्यानंतर खात्री यांनी भाऊ अब्दुल यास बोलावले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय शुक्ला, जलाल शेख, मनोज सरदार, स्वप्निल गोसावी, विकास कापुरे यांनी घटनास्थळी आले. श्वान पथकाने मेन रोड मार्गाने दिशा दाखविली. या प्रकरणी मोहंमद हुसेन खत्री यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.