शहाद्यामार्गे गुजरातला जातेय नकली दारु !

0

शहादा । सातपुड्याच्या दुर्गम भागात तयार होणारी नकली दारु ( मद्यसाठा ) शिरपूर तालुक्याचा सीमेवर काही गावामध्ये तयार करून शहादामार्गे गुजरात राज्यात पोहोचवली जात आहे. मद्यतस्करी करणारी टोळी मद्यप्रदेशातील असून त्यांना स्थानिक तस्कर सहकार्य करीत असल्याचे उघडकीस आले आहे.मालकातरभागात वेगवेगळ्या कंपनीच्या नकली दारु तयार केली जाते. बाटल्यांना लेबल लावले जाते. कंपनीचे शिक्के असलेले खोके तयार करून बाटल्या भरल्या जात आहेत. रसायन मिश्रण करून दारु तयार केली जाते. ही दारू आरोग्यास प्रचंड हानिकारक असून गालाला, डोळ्यांना व गळ्याला सुज येण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली आहे. इतर कंपनीच्या दारु पेक्षा ही दारू स्वस्त दरात मिळत असल्याने नागरिक बळी पडत आहेत. ही नकली दारु सर्वांत जास्त गुजरात राज्यात पाठविली जात असल्याची माहिती आहे.

नाकाबंदी असतांना होतेय दारूची वाहतूक
आयशर सारख्या गाड्यांमध्ये दारुची वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे. शिरपूर-शहादा मार्गे सावळदा फाटा व्हाया शिरुड मार्गे तळोदा गुजरातकडे नेतात. तर काही गाड्या पानसेमल, खेतीया, राणीपूर, दरा, धडगाव, मोलगी मार्गे सरळ गुजरात जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यप्रदेश सिमेलगत रायखेड येथे नाकाबंदी असतांना दारूच्या खोक्यांनी भरलेल्या गाड्या महाराष्ट्रात शहादा तालुक्यात प्रवेश करून गुजरात राज्यात जात असून देखील कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही गाड्या सुलवाडे, म्हसावद, बुढिगव्हाण, पाड्ळदा वैजालीमार्गे भल्या पहाटेस जात असल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक होत असताना महिन्यातून केवळ एक-दोन वेळा कारवाई करून पोलीस प्रशासन केवळ नावाला गुन्हे दाखल करत आहे.