शहापुरातील खड्डयाबाबत सीटू संघटना आक्रमक

0

शहापूर : शहापूर तालुक्यातील विविध निधींतून झालेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी भारतीय ट्रेड युनियन (सीटू)संघटनेने तहसीलदार शहापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेचे विजय विशे, नवनाथ पावसे, मनिष फोडसे, अशोक विशे, दशरथ पाचघरे, प्रशांत महाजन, रघुनाथ तारमळे, मयुर निमसे, संजय वाढविन्दे, विष्णू सासे या शिष्टमंडळाने तालुक्यातील रस्त्याबाबत आक्रमक होऊन खड्ड्याप्रकरणी दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे.

शहापूर हा आदिवासी तालुका असून तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून तालुक्यातील व शहापूर शहरातील अंतर्गत रस्ते व इतर रस्त्यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतू अल्पावधीतच या डांबरी रस्त्याची चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दूर्गम भागातून रूग्ण व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर खर्च केलेला निधी पाण्यात गेल्याचा आरोप सीटू संघटनेने केला आहे.