शहापूर । शहापूर शहरातील वाहतूककोंडी आणि रस्त्याच्या मजबूतीकरणास अडथळा ठरणार्या चेरपोली पूल ते आसनगाव रेल्वेस्थानक रस्त्यामधील विद्युत खांब व रोहित्र स्थलांतरासाठी 40 लाख रुपयांचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांने मंजूर झाला आहे. शहापुरातील चेरपोली पूल ते आसनगाव स्टेशन दरम्यानच्या रस्त्यासाठी यापूर्वी 3 कोटींचा प्रत्येक आमदारांना मिळणारा विशेष निधी आमदार पांडुरंग बरोरा यांनी मंजूर करून घेतला. मात्र, हा निधी कमी असल्याने आणखी 2 कोटी रुपयांच्या निधीसाठी बरोरा हे प्रयत्न करत आहेत.
रस्त्यातील अडथळा झाला दूर
मंजूर झालेल्या 3 कोटींमध्ये आशीर्वाद हॉटेल ते चेरपोली पूल हा रस्ता काँक्रीटीकरण होणार आहे. तर उर्वरित आसनगाव फाटक ते आशीर्वाद हॉटेल हा रस्ता डांबरीकरणाने मजबूतीकरण होणार आहे. हा रस्ता होण्यापूर्वी रस्त्याच्या मजबूतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण आणि वाहतूक कोंडी यासाठी विजेचे पोल व रोहित्र यांचा अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे पोल व रोहित्र दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासाठी महावितरणला सुमारे 40 लाखा रुपयांचे बजेट होते. याबाबत विद्युत विकास (जिल्हास्तर) या उपशिर्षाअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडेे आमदार पांडुरंग बरोरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून 40 लाख 85 हजार 575 रुपये निधी मंजूर करून घेतल्याने रस्त्यालगत अडथळा ठरणारे व धोकादायक पोल हटणार आहेत.
नागरिकांना दिलासा
अडथळा ठरणार्या चेरपोली पूल ते आसनगाव रेल्वेस्थानक रस्त्यामधील विद्युत खांब व रोहित्र स्थलांतरामुळे होणारे अपघात टळणार आहेत. तसेच रस्त्याची रुंदीसुद्धा लवकरच वाढणार असून शहापूर शहरातील बाजारपेठ नक्कीच भव्यदिव्य दिसणार असून वाहतूककोंडीची सर्वात मोठी समस्यादेखील या निमित्ताने दूर होणार आहे. महावितरणला निधी मंजूर करून दिल्याने याबाबत शहापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी बरोरा यांचे अभिनंदन केले आहे.