शहापूर : शहापूर तालुक्यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच हे खड्डे तातडीने भरून संबंधित दोषी अधिकार्यावर कारवाईसाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी मंगळवारी खड्ड्यात बसून आंदोलन केले. ह्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर यांना दिलेल्या निवेदनानुसार शहापूर तालुक्यातील आणि शहरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. ह्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. 2013 पासून आतापर्यंत या सर्व रस्त्याची दक्षता विभाग आणि सीआयडीमार्फत चौकशीची मागणी वेखंडे आणि खाडे यांनी पोलीस निरीक्षक, शहापूर व सार्वजनिक बांधकाम विभाग, शहापूर यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
शहापूर शहरातील डीवायडराना रंग न दिल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला रंग भेट देण्यात आला आहे. तसेच गणपती आगमनापूर्वी खड्डे न भरल्यास गणेश विसर्जन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
कार्यालयात करण्याचा इशारा अपर्णा खाडे यांनी दिला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बिलगोजी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात गणेश उत्सवापूर्वी खड्डे भरुन रस्ते सुस्थितीत केले जातील, असे सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.