शहापूर । सध्या सगळीकडेच जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक होत असल्याची ओरड होत आहे. याबाबत शहापूर तालुक्यातील ग्राहकांची ओरड लक्षात घेऊन मनसेने शहापूर तालूका वैद्यमापणशास्त्र निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करून जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक करणार्या विक्रेत्यांवर जीएसटी नंबरची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जीएसटी क्रमांक न घेता फसवणूक
तालुका वैद्यमापनशास्त्र निरीक्षक यांना शहापूर मनसे तालुका अध्यक्ष जयवंत मांजे, मनविसे तालुका अध्यक्ष विजय भेरे, उपाध्यक्ष प्रशांत गडगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार मुंबई य नाशिक महामार्गावरील हॉटेलमध्ये तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी जीएसटी क्रमांक न घेता ग्राहकांना खोटी जीएसटी लावून वस्तूंच्या अव्वाच्या सव्वा दर लावून लुबाडणूक होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
कारवाईची केली मागणी
काही हॉटेलमध्ये जीएसटी व एसएसटी असे दोन्ही कर घेतले जातात अशीही ओरड होत आहे. त्यामुळे तालुक्यातील जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक करणार्या दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करुन अशा प्रकारांना आळा घालून सबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात आली नाही तर मनसेतर्फे आंदोलन ही करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यांत आला आहे.