किन्हवली । किन्हवलीत डासांची उत्पत्ती अधिक झाल्याने डेंग्यू या जिवघेण्या आजाराचे रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील मुस्लिम मोहल्ल्यातील मशिदीचे बांगी सद्दाम कासिम अन्सारी यांनाही या आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील मुस्लिम मोहल्ल्याच्या मशिदीतील बांगी सद्दाम कासिम अन्सारी(22)यांना डेंग्यू या आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर पाच दिवसापासून सरळगाव येथील ओम साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस सुमारे 9 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. किन्हवली येथील आशा पॅथेलॉजिने या बाबत किन्हवली आरोग्य केंद्रास लेखी कळविले होते. दरम्यान 4 नोव्हेबर रोजी मानेखिंड येथील भारती पडवळ (26) यांनाही डेंग्यूची लागण झाला होता. त्या मुरबाड येथे उपचार घेऊन घरी आल्या आहेत. काल(दि.6) गुरुकुलनगर येथील श्रद्धा शेलवले (21) यांनाही डेंग्यू सदृश आजाराची लागण होत असल्याचे आशा पॅथॉलॉजी लॅब मधून कळाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.रमाकांत आगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने अजूनही इथे कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. परिणामी, अनेक रूग्णांना शहापूर किंवा मुरबाड सारख्या ठिकाणी खासगी व महागडे उपचार घ्यावे लागतात.या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांतून दररोज नवनवीन डॉक्टर बाह्यरुग्ण सेवेसाठी येत असतात. मंगळवारी खर्डी-टेंभे येथील डॉ. कुंदन चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी लहू शेलवले यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते सुट्टीवर आहेत. परंतु त्यांच्या गैरहजेरीत आशा पॅथॉलॉजी लॅबने डेंग्यू रुग्णाबाबत वारंवार कळवूनही किन्हवली आरोग्य केंद्राने दुर्लक्ष केले.
आमच्या लॅबमध्ये डेंग्यू अथवा अन्य साथीच्या आजाराचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की तातडीने
आरोग्य केंद्रास कळवतो.
-अजित आचार्य
लॅब टेक्निशियन-आशा पॅथॉलॉजी लॅब, किन्हवली.