शहापुरात भरधाव कारनं चौघांना चिरडलं; हुबळीतही अपघातात मुंबईचे ६ जण ठार

0

मुंबई : मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ आज एका भरधाव कारनं रस्त्याच्या बाजूला वाहनांची वाट बघत उभ्या असलेल्या प्रवाशांना उडवलं. या झालेल्या अपघातात चौघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकातील हुबळी येथेही ट्रक आणि बसच्या धडकेत सहा जण ठार झाले तर दहा जण जखमी झाले आहेत.अपघातातील मृत प्रवासी मुंबईतील आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ काही प्रवासी वाहनांची वाट बघत उभे होते. त्याचवेळी भरधाव कारनं या प्रवाशांना चिरडलं. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्याला सुरुवात करून जखमींना तातडीनं रुग्णालयात नेले.

हुबळीत अपघातात मुंबईतील ६ जणांचा मृत्यू

कर्नाटकातील हुबळी येथे राष्ट्रीय महामार्ग ६३ वर बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. हे सर्व जण मुंबईतील असून ते खासगी बसनं कर्नाटकला जात होते. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. त्यांना कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.