अमळनेर । तालुक्यातील शहापुर येथील 25 वर्षीय तरूण शेतकर्यांने शेतात रात्री 11 वाजेच्या सुमारास विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही घटना गुरूवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मारवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शहापुर येथील सागर विश्वास पाटिल (वय-25) या तरुण शेतकर्याने स्वतःच्या शेतात रात्री 11 च्या सुमारास विषारी औषध प्राशन करुण आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सकाळी उघडकीस आली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असले तरी, कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे परिसरात बोलले जात आहे. बुधवार 2 ऑगस्ट रोजी रात्री सागर याने जेवण केल्यानंतर घराबाहेर पडला. गावातील मंदिरात किर्तनसप्ताहचा कार्यक्रम सुरु असल्याने तिथे गेला असेल या समजने आईने रात्री उशिरापर्यंत त्याची वाट पाहिली. मात्र तो न आल्याने शोध घेतला असता तो दिसून आला नाही.
मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सकाळी त्याच्या शेतात गेल्यानंतर मृतदेह दिसल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. सागर पाटील कडे दोन हेक्टर शेती असून मोठा भाऊ कामानिमित्त पुण्याला आहे. गावात आई आणि सागर हे दोघीच राहत होते. शेती आईच्या नावावर आहे. मात्र मागील दोन ते तीन वर्षापासून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने सागरवर सेंट्रल बँकेचे सुमारे पावणे दोन लाखांचे ठिबकसाठी तर पिककर्ज चाळीस हजार रुपये होते. सध्यस्थितीत यावर्षीही दुबार पेरणी आणि पिकपरिस्थिती बरोबर नसल्याने तो मागील आठ दिवसापासून उदासीन होता. विधवा आई आणि दोघे भाऊ यात गावावर शेतीतून उत्प्पन नसल्याने मोठ्या भावाला कामानिमित्त पुण्याला पाठविले होते. मात्र पिककर्ज, ठिबक सिंचनसाठी घेतलेले कर्ज व दुष्काळ ग्रस्त परिस्थिती ओढवल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिस पाटील भाऊसाहेब पाटिल यांच्या माहितीवरुन मारवड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार जयवंत पाटील करीत आहेत.