शहापूर । जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच निवडणूक आयोगाच्या नवीन नियमानुसार पहिल्यांदाच शहापूर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या नागरिकांना थेट सरपंच निवडीची संधी मिळणार आहे. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबत शहापूर तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार कोमल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या नवीन नियमानुसार दोन महिन्यांत मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या सदस्य व थेट सरपंच निवडीचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
9 ऑक्टोबरला मतमोजणी
यामध्ये शहापुर तालुक्यातील लवले, कानवे, नांदवळ ,बाभळे चिखळगाव ह्या पाच ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार असल्याने येत्या 15 सप्टेंबरपासून निवडणुकीची नामनिर्देशन प्रकिया सुरू होऊन 7 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. ह्या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व सदस्य आणि सरपंच अश्या दोन्ही निवडीसाठी एकाच दिवशी मतदान होणार असल्याने नागरिकांना मते देऊन थेट सरपंचही निवडावा लागणार आहे. त्यामुळे थेट सरपंच निवडीबाबत तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला असून नागरिकांना थेट सरपंच निवडीची संधी मिळणार असल्याने उत्सुकता लागली आहे.