किन्हवली : शहापूर तालुक्यातील ग्रामीण साहित्यीक कवी गोपाळ वेखंडे, रमेश तारमळे, मधुकर हरणे यांना पुणे येथे साहित्य गौरव संस्थेने नुकताच साहित्यगौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीने अवघ्या ठाणे जिल्ह्याला वेड लावणारे शहापूरच्या मातीतील कवी, लेखक, कथाकार,गोपाळ वेखंडे यांचा देवमाणूस कथासंग्रह, पहाडी आवाजाने कविता सादर करून श्रोत्यांना भुरळ घालणारे कवी रमेश तारमळे यांचा सुर्य हाती देताना…! हा काव्यसंग्रह व, संवेदनशील कवी म्हणून परिचीत असलेले मधुकर हरणे यांचा बदलता गावगाडाअशी तिनही पुस्तकांचे लेखक व अन्य साहित्यिकांना डॉ.मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केलेल्या साहित्य गौरव या संस्थेच्या वतीने रविवारी सदाशिव पेठ, पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी डॉ योगेश जोशी, डॉ पल्लवी बनसोडे व डॉ मधूसूदन घाणेकर आदी साहित्यीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ ऋचा घाणेकर थत्ते व तन्मयी घाणेकर यांनी बिनभिंतीची शाळा हा निसर्ग कवितांचा कार्यक्रम सादर केला. मंदा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.