शहापूर तालुक्यातील नांदगावचा पुलाच्या नुतनीकरणाची मागणी

0

किन्हवली : शहापूर तालुक्यातील किन्हवली-सो-कोचरे या प्र.जि.मा क्रमांक 62 या रस्त्यावरील नांदगाव शेजारील नाणी नदीवरील अरूंद व कमी उंचीच्या पुलाचे नुतनीकरणाची मागणी आता जोर धरू लागली आहे. संततधार पावसामुळे हा पूल नेहमीच पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटतो. वासिंद-शेरे-शेंद्रूण-किन्हवली-सोगाव-कोचरे या प्र.जि.मा.क्रमांक 62 या रस्त्यावरील नांदगाव शेजारील नाणी नदीचा पुल कमी ऊंचीचा व अरूंद आहे. त्यामुळे तो नेहमीच पाण्याखाली जातो. त्यामुळे परिसरातील 20 -22 आदिवासी वाड्या-पाड्यांचा किन्हवली या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालय, दवाखाने, बँका तसेच बाजारहाट करण्यासाठी येथील नागरीकांना सावरोली-कानडी अशा 6 कि.मी अंतराच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. नांदगाव येथील नाणी नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नाणी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी असून तो अरूंद आहे. या मार्गाचे नुतनीकरण करताना हा पुलही नव्याने बांधण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
– मंगल दवणे, माजी सदस्य, पंचायत समिती, शहापूर

नाबार्ड किंवा इतर योजनांच्या कार्यक्रमातून या पुलाच्या नुतनीकरणासाठी आर्थिक तरतूद व्हावी असा प्रस्ताव पाठविला असून तो मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे.
– शशिकांत चौधरी, कनिष्ठ अभियंता, सा.बां.विभाग, शहापूर