शहा कधीपासून पंचाग पहायला लागले?

0

कोल्हापूर/पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदार टोला लगाविताना, अमित शहांनी भविष्य सांगण्याचा ‘नवीन व्यवसाय‘ कधी सुरु केला? असा सवाल केला. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती, त्यावरही पवारांनी खोचक सवाल केला. ते म्हणाले, मंत्री कोण असणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात, पण आता हे निर्णय कोल्हापुरातून होत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही पवारांनी आडव्या हाताने घेतले. राजू शेट्टींचे कार्य माहित आहे, पण दुसरे खोत कोण? हे मला माहित नाही, असा चिमटाही पवारांनी खोतांना काढला. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या घरी त्यांची विचारपूस करण्यासाठी पवार कोल्हापुरात गेले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, राज्य सरकार आणि इतर घडामोडींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची हाव!
शरद पवारांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 50 वर्षे भाजपचे सरकार केंद्रात राहील, असे अमित शहा कसे काय म्हणतात? पंचाग घेऊन भविष्य सांगण्याचा नवीन व्यवसाय त्यांनी कधी सुरु केला हे मला माहित नाही! कोणी किती दिवस सत्तेवर राहील याचा निर्णय जनता करेल, असेही पवार म्हणाले. राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची हाव असून, भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांना सत्ता सोडवेना झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राज्याचा कारभार चालल्यामुळे ना खाऊंगा ना खाणे दुंगा हे स्लोगन खोटे ठरले आहे, असा टोलाही पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरांना लगाविला. आमच्या काळात एखाद्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर पहिल्यांदा ते मंत्री राजीनामा देत असत. त्यानंतर चौकशी केली जात असे, कारण आम्ही बरेच वर्षे सत्तेत होतो. त्यामुळे आमच्याकडे निलाजरेपणा नव्हता. मात्र, आता त्या उलट परिस्थिती आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही मंत्री राजीनामा देत नाहीत; कारण त्या मंत्र्यांमध्ये निलाजरेपणा वाढला आहे. त्यांना बर्‍याच वर्षांनी सत्ता मिळाली आहे, यानंतर सत्ता मिळेल की नाही? याबाबत खात्री नाही, त्यामुळे आरोप होऊनही ते सत्तेला चिकटून आहेत, असा टोलाही पवारांनी हाणला.

सदाभाऊंना टोला, राणेंना शुभेच्छा!
खा. राजू शेट्टी यांचे लोकसभेतील काम दिसते. मात्र दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहित नाहीत, त्यांचे योगदान काय? असे म्हणत पवारांनी खोत यांना टोला लगाविला. शेट्टी-खोत वादाविषयी पवारांना विचारण्यात आले असता, खोत यांनी कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते कुठे अ‍ॅडमिट होते? असे सवाल करत शेतकरी चळवळीत सदाभाऊ खोत यांचे काडीचेही योगदान नाही, हे ठळकपणे निदर्शनास आणून देत, खा. शेट्टी यांची बाजू घेतली. दरम्यान, पवारांना नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाविषयी विचारण्यात आले असता, ते म्हणाले, नारायण राणे यांनी निर्णय जाहीर केला आहे की नाही, हे मला माहित नाही. ते आमचे स्नेही आहेत. त्यांना भाजपप्रवेशासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असेही पवारांनी सांगितले.