वडगाव मावळ । भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करणार्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे प्रतिष्ठान मावळ यांच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पवनानगर येथील पवना विद्यामंदिर येथे बुधवार (दि. 9) व गुरुवार (दि. 10) रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे असणार आहेत. तर यावेळी पुणे जिल्हा भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार रुपलेखा ढोरे, माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तपासणी आणि उपचार
शिबिरात हृदयरोग, कॅन्सर, मणक्याचे आजार, मोतीबिंदू व तिरळेपणा, कान, नाक व घसा, पोटातील गाठी, फाटलेले ओठ व टाळूवरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दंतचिकित्सा, त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, किडनी व मूत्रमार्गाचे विकार, अपेन्डिक्स, हार्निया, अँजिओग्राफी, अँजोप्लास्टी, श्रवण यंत्र, चष्मा, अपंगांना जयपूर फूट यांचे मोफत तपासणी, उपचार व वाटप करण्यात येणार आहे. शिबिरात पवना हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, एमआयएमईआर मेडिकल कॉलेज, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद मावळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, हिमालया ड्रग कंपनी, सेनफोर फार्मासिटिकल, अलकेन लॅबोरेटरी, एफडीसी कंपनी, एबोट हेल्थ केअर या संस्था सहभागी होणार आहेत. शिबिरासाठी येताना नागरिकांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, आधारकार्ड आणि पूर्वी काही आजार असल्यास त्याची कागदपत्रे आणावी लागणार आहेत. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजिक तपासण्या तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून मावळ तालुक्यात आणखी तीन ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी दिली.